संपादकीयसाप्ताहिक सदर

आंबेडकरवादी गझलचा प्रारंभ – प्रमोद वाळके ‘युगंधर’

"आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य" हे साप्ताहिक सदर आम्ही मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी सुरू केले आहे. दर रविवारी प्रसिद्ध होणा-या या सदरामधून ज्येष्ठ आंबेडकरवादी गझलकार प्रमोद वाळके "युगंधर" आणि आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. प्रकाश राठोड आंबेडकरवादी गझलेच्या संदर्भाने भूमिका मांडणार आहेत. आपण सर्व या नव्या सदराचे निश्चित स्वागत कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले काही प्रश्न असल्यास मराठी साहित्य वार्ताला जरूर कळवा अथवा खाली लेखकांचा संपर्क दिला आहे. त्यावर आपण आपल्या प्रतिक्रिया द्याव्या - संपादक

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य – भाग ३

गझल हा गेय प्रकार आहे. या प्रकारासाठी वापरल्या जाणाऱ्या वृत्तांचा निर्माता बसरा निवासी खलील बिन अहमद फरीद बसरी आहेत. ते संगीततज्ज्ञ, संस्कृत व युनानी छंदांचे ज्ञाता होते. त्याचप्रमाणे युनानी आणि अरबी भाषेचेही ज्ञाता होते. त्यांनी धोबीघाटावर कपडे आपटताना होणाऱ्या आवाजातून फऊल या गणाची निर्मिती केली. त्यातूनच पंधरा अरबी छंदाची निर्मिती केली. ते आठवे शतक होते अशी माहिती मिळते.

गझल या विधेचे जन्मस्थळ अरबी भाषा असले तरी पुढील काळात ती फारसी, उर्दू, नेपाळी, हिंदी भाषेतील रचनाबंधाचे मुलूख काबीज करीत मराठीसहीत जवळपास प्रत्येकच भाषेत तिने आपला विस्तार केला आहे. त्यांत गरजेनुसार अनुरूप बदल होत गेलेत आणि अनेक वृत्तांची भर पडत गेली. असा गझलचा विस्तार होण्याचे मुख्य कारण गझलेतील प्रत्येक द्विपदीतून येणारी उत्कंठावर्धक शब्दांची मालिका आहे असे मला वाटते. अरबी भाषेत निर्माण झालेले छंद फारसी आणि कालांतराने उर्दू भाषिकांनी अनुसरले. या छंदांना अनुलक्षून आज विपुल प्रमाणात गझल लेखन होत आहे. उर्दू गझलांमध्ये बहुतांश गझलातून स्त्री यासंबंधी हितगूज, प्रणयक्रिडेच्या गोष्टी, ईश्वर, श्रद्धा, भक्ती या अनुषंगाने गझललेखन होत असल्यामुळे त्यात आशिक, माशुक, रकीब, हिज्र, विसाल, शेख, जाहिद, मोहतसिब अशा शब्दांचा भरणा जास्त प्रमाणात दिसतो आहे. अर्थातच प्रियकर-प्रेयसीचे भावविश्व गझलांमधून साकार करताना त्यांच्या अभिव्यक्तीला पूरक अशाच प्रतिमा-प्रतीकांचा वापर सर्वत्र दिसतो. अशा प्रकारचे भाव गझलमधून अभिव्यक्त होत असताना गझलच्या अभिव्यक्तीमध्ये बदल करणारे मिर्झा गालिब, हाली, इक्बाल, हसरत मोहानी, जोश, जिगर यासारखे गझलच्या आधुनिक युगाकडे जाणारे गझलकार पुढे आलेत आणि गझलचा स्वभाव, गझलमधून उमटणारा भाव बदलू लागला आणि जनतेपुढे मुशायरा, कव्वाली गायनाच्या माध्यमातून येऊ लागला. हा स्वर, हा लहजा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गावागावात पोहोचविण्यासाठी बाबासाहेबांच्या चळवळीला समर्पित असणाऱ्या लोककवींनी स्वीकारला.

त्यात भाऊ फक्कड, किसन फागोजी बनसोड, भीमराव कर्डक, केरूजी घेगडे, श्रीधर ओहळ, नागोराव पाटणकर, राजानंद गडपायले, लक्ष्‍मण केदार, वामनदादा कर्डक अशी काही नावे देता येतील. त्यातील काही कवींनी आपल्या गेय रचनेतून गझलसदृश रचनाही केलेल्या आढळतात. त्यांच्या गझलसदृश्य रचनांवर उर्दू गझलकारांच्या गायन आणि लेखनाचा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडलेला आढळतो. माधव ज्युलियन यांनी १९२० च्या दशकात लेखनाला प्रारंभ केला असला तरी आणि वंदनीय सुरेश भटांनी मराठी गझल साहित्यप्रेमी जनांपर्यंत पोहचवली असली तरी मराठी गझलांचे उर्दू गझलांसारखे स्वतंत्र मुशायरे होत नसल्यामुळे मराठी गझलांचा प्रभाव बाबासाहेबांच्या चळवळतील लोककवींवर पडणे शक्यच नव्हते.‌ त्यामुळे माधव ज्युलियनांपासून सुरेश भटांपर्यंत लिहिली जाणारी मराठी गझल सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यांची रचना ज्यांना साहित्याची आवड आहे अशाच रसिक, लेखक, कवी आणि अभ्यासकांपर्यंतच मर्यादित राहिली असे दिसून येते.

समानता प्रस्थापित करण्यासाठी सुरू झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींनी प्रत्येकाच्याच मनात विद्रोहाची, क्रांतीची ठिणगी पेटवली होती. जे काव्यलेखन करीत होते त्यांच्याही मनात हिंदू धर्मातील अव्यवस्थेमुळे अग्नीशिखांचा भडका होणे स्वाभाविकच होते. त्यांच्या लेखण्या विद्रोह पेरू लागल्या होत्या. अशावेळी सूचेल त्या आणि जमेल त्या काव्यप्रकाराचा आधार घेऊन कवी आणि गीतकारांच्या लेखण्या पुढे सरसावल्या आणि लिहू लागल्या होत्या. त्यांनी सत्यशोधकी जलसा, आंबेडकरी जलसा, आंबेडकरी कलापथके, गायनपार्ट्या, भीम प्रासादिक भजनी मंडळे, कव्वालपार्टीतून या कवींची गाणी प्रवाहित व्हायला लागली. इतर गायनप्रकारातून गझलसदृश्य रचना किंवा गझल पेश केली असावी या म्हणण्याला फारसा दुजोरा न देता कव्वाली गायनातून पेश केलेल्या गीतांमध्ये गझलचाही समावेश होता असे म्हणणे उचित ठरेल. या कवींच्या आणि गीतकारांच्या लेखणीतून गझलसदृश्य, ज्याला आम्ही गजलांगणी म्हणतो, अशा रचनांची निर्मिती झाली.

१९५६ नंतरही जातीप्रथेच्या मानसिकतेतून केल्या जाणाऱ्या छळांविरोधात बाबासाहेबांनी सुरू केलेल्या लढ्यामुळे कवींच्या मनात निर्माण होणाऱ्या आक्रोशाला त्यांच्या शब्दसामर्थ्याच्या जोरावर क्रांतीरूप देणारे काव्य निर्माण झाले अशा काव्यनिर्मितीच्या प्रक्रियेतूनच पुढे ज्या कवींनी गझलसदृश्य (गझलांगणी) रचना केलेल्या आढळतात त्यात राजानंद गडपायले, वामनदादा कर्डक, लक्ष्मणदादा केदार यांच्या रचनांतील उदाहरणस्वरूप द्विपदी देत आहे.

आली न कधीही कीव तुला ह्या भोळ्या जिवाला छळताना
दिसला का कधी हा जीव तुला प्रेमाच्या फुलाहुन ढळताना
– वामनदादा कर्डक

माणसा रे माणसाशी माणसांसम वाग तू
हाक येता दुर्बलांची त्या हाकेला जाग तू
– लक्ष्मणदादा केदार

मला दुनियेत बुद्धीचा खरा बुद्धिवंत आवडतो
जसा बोले तसा चाले असा शीलवंत आवडतो
– नागोराव पाटणकर

या रचनांना पूर्णतः तंत्रशुद्ध रचना म्हणता येत नाही. परंतु गझलतंत्राच्या पाऊलवाटेवर जाणारी रचना असल्यामुळे हाच आंबेडकरवादी गझलचा प्रारंभ आहे असे म्हणायला मोठा स्पेस आहे. मराठी गझलकडे दृष्टिक्षेप टाकला तर कवी यशवंत, विं. दा. करंदीकर, सुरेश भट, वसंत बापट, शांता शेळके इत्यादी कवी सुरुवातीच्या काळात गझलसदृश्य रचना करीत असल्याचे निदर्शनास येते. बाबासाहेबांच्या चळवळीला समर्पित असणाऱ्या कवींच्या रचना गझलतंत्राच्या जवळपास जाणाऱ्या होत्या हे त्यांच्या रचना वाचून जाणवते. गझल लिहिता यावी यासाठी केलेले हे प्रयोगच होते. अशा प्रयोगांद्वारे पुढे वामनदादा कर्डक यांनी तंत्रशुद्ध गझल लिहिण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. वामनदादा कर्डक यांचा भारतामध्ये ख्यातकीर्त असलेले उर्दू कव्वाल, गझल गायकांशी संपर्क आला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी उर्दूशास्त्राचाही अभ्यास केला होता. त्यामुळे गझलसोबतच त्यांनी उर्दू काव्यातील कसीदा, मर्सिया, मसनवी, खमसा यासारखे अनेक प्रकार हिंदी आणि मराठीमध्ये आणले आहेत. मराठी वाङ्मयातील ही प्रशंसनीय घटना आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीशी वामनदादा कर्डक यांच्याबरोबर अनेक कवी प्रत्यक्ष जोडले गेले होते. परंतु बाबासाहेबांचा सांगावा गावोगावी, खेडोपाडी सांगत असताना वामनदादा बाबासाहेबांच्या सान्निध्यात आले होते. त्यांच्या चळवळीतून मिळालेली ऊर्जा घेऊन १९४३ मध्ये स्वत:ची नाममुद्रा घेऊन त्यांनी एक क्रांतिगीत लिहिले. ते गीत मुंबईच्याच एका सभेत गायिले. त्यावेळी त्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर त्यांनी गीत लेखनाची सुरुवात केली. गीतलेखन करीत असतानाच गझल लेखनही केले. हाती आलेल्या पुराव्यानुसार १९५० पासून वामनदादांनी गझल लेखनास प्रारंभ केला असल्याचे निदर्शनास आले. आणि हाच आंबेडकरवादी गझलचा प्रारंभ आहे असे मला वाटते. या अनुषंगाने भगिनी डॉ. प्रतिभाताई वाघमारे- खोब्रागडे यांचा “वामनदादांच्या गझलांचे सौंदर्यविश्व” हा संशोधनग्रंथ लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे, हे सांगायला मला आनंद होतो आहे.
(क्रमशः)

प्रमोद वाळके ‘युगंधर’,
नागपुर
संपर्क – ८३२९३७४९९६

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

 

शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

6 Comments

 1. लेख मालिका उत्तरोत्तर बहरत आहे सरजी . आजचा लेखात ” आंबेडकरी गझलेचा ” फारच अभ्यासपूर्ण आणि सोदाहरण आढावा घेण्यात आला आहे . या उपक्रमातून निश्चितच आंबेडकरी गझल अगदी तळागाळातील जन सामान्या पर्यंत पोहोचवता येईल आणि आंबेडकरी गझलेचे खरे जनक आदरणीय वामनददा यांच्या कर्तुत्ववाला उजाळा देता येईल .
  मनःपूर्वक अभिनंदन सर !

 2. मराठी गझल सामान्यतः सामान्य माणसापर्यंत पोहचली नाही, हे आपले मत योग्यच आहे. आंबेडकरवादी गझलेच्या विकासाची प्रक्रिया नोंदवत असताना आपण तिच्या उत्क्रांतीचा उलगडलेला पट म्हणूनच महत्त्वाचा आहे. गझल हा एक कृत्रिम काव्यप्रकार आहे अशी टीका सातत्याने होत राहिल्याने आंबेडकरवादी साहित्यातले बरेच प्रतिभावान कवी गझलकार होण्यापासून उपेक्षित राहिले हे वास्तवही नाकारून चालणार नाही. पुढे अनेक कवींनी आपली तहान गझलसदृश्य लेखणीतून भागवली. मराठी साहित्यात माधव ज्युलियन नंतर..सुरेश भटांच्या झंझावाती प्रभावात नवी पिढी गझल लेखनाकडे ओढल्या गेली. तर दुसरीकडे वामनदादांच्या आंदोलक प्रवाहात ‌चळवळ संमिलीत झाली. लोककवी वामनदादांचा मोठा प्रभाव आजतागायत या पिढ्यांवर कायम आहे. त्यांनी आपले लेखन गीतप्रकारातून केले. गीतातून प्रबोधन करणे अधिक सोपे असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सामान्यतः हा मार्ग निवडला असावा. त्यामुळे सामान्य माणसांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. मात्र आज आपण करीत असलेल्या मांडणीमुळे गझलकार वामनदादांच्या गझल कर्तृत्वाचे सोनेरी पान खऱ्या अर्थाने जगा समोर येत आहे. ही फार मौलिक गोष्ट आहे , शिवाय यातील आपले योगदान शब्दातीत आहे. आपले पुढील लेख वाचण्याची उत्सुकता म्हणूनच निर्माण झाली आहे.
  सविनय जयभीम !

  विनोद बुरबुरे
  यवतमाळ

 3. आदरणीय वाळके सर, सविनय जयभीम.
  आंबेडकरवादी गझलेच्या प्रारंभबिंदूची सुसंबद्ध मांडणी अभ्यासपूर्ण सामर्थ्यानिशी करून गझलेतिहासाला एक गौरवशाली नवे पान आपण जोडल्याचा अत्यानंद होत आहे.आपल्या महत्प्रयासाने आंबेडकरवादी गझलेची कोरीव लेणी गझल विश्वात यशस्वीपणे उत्किर्ण होत राहिल. या मंगल कामनेने आपले हार्दिक अभिनंदन! सस्नेह जयभीम!
  सूर्यकांत मुनघाटे
  नागपूर

  1. मला दुनियेत बुद्धीचा खरा बुद्धिवंत आवडतो
   जसा बोले तसा चाले असा शीलवंत आवडतो
   – ही गज़ल नागोराव पाटणकर यांची नसून कवी राजानंद गडपायले यांची आहे.

 4. मला दुनियेत बुद्धीचा खरा बुद्धिवंत आवडतो
  जसा बोले तसा चाले असा शीलवंत आवडतो
  – ही गज़ल नागोराव पाटणकर यांची नसून कवी राजानंद गडपायले यांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close