लोकसंवादसाप्ताहिक सदर

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य (भाग १) – प्रमोद वाळके ‘युगंधर’

"आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य" हे साप्ताहिक सदर आम्ही मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी आजपासून सुरू करतो आहोत. दर रविवारी प्रसिद्ध होणा-या या सदरामधून ज्येष्ठ आंबेडकरवादी गझलकार प्रमोद वाळके "युगंधर" आणि आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. प्रकाश राठोड आंबेडकरवादी गझलेच्या संदर्भाने भूमिका मांडणार आहेत. आपण सर्व या नव्या सदराचे निश्चित स्वागत कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले काही प्रश्न असल्यास मराठी साहित्य वार्ताला जरूर कळवा अथवा खाली लेखकांचा संपर्क दिला आहे. त्यावर आपण आपल्या प्रतिक्रिया द्याव्या - संपादक

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य – प्रमोद वाळके ‘युगंधर’

मराठी साहित्य वार्ता या डिजिटल गृपच्या वेब पोर्टलचे दि. १९ जुलै २०२० ला उद्घाटन झाल्यापासून या वेब पोर्टलवर अनेक विषयांवर लेखन केले जात आहे. त्यात प्रामुख्याने डॉ. सुनीता धर्मराव यांचा ‘ओवी गीतातील स्त्रीवाद’, डॉक्टर अरविंद सुरवाडे यांचा ‘देहवाली’ (आदिवासी ) बोलीची माहिती देणारा लेख, वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी यांचा ‘ओळख वृत्तबद्ध कवितेची’ या विषयाच्या अनुषंगाने असलेले सर्वच भागातील लेख, बाळकृष्ण रामचंद्र लळीत यांचा ‘वि. स. खांडेकर’ यांच्या साहित्यासंदर्भातील माहितीपर लेख असे काही उल्लेखनीय आहेत. या आणि अशा अनेक लेखान्वये अत्यंत उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण लेखनाची मालिका सुरू केली आणि अनेकांच्या प्रज्ञप्तीला मोठी चालना मिळाली. हे होऊ शकले. याला वेब पोर्टलचे मुख्य संपादक अमरदीप वानखेडे आणि त्यांचे सर्वच सहकारी सन्मित्र कारणीभूत आहेत. अमरदीपकडे असलेली त्या त्या विषयावरील अभ्यासक हेरण्याची दृष्टी कारणीभूत आहे आणि त्यांच्याबरोबर सम्यक प्रज्ञेतून एकत्र आलेले तंत्रज्ञ आणि प्रशासनिक कार्यकर्ते कारणीभूत आहेत.

मराठी साहित्याच्या क्षेत्रात अनेक साहित्यिक कार्यरत आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि साहित्य अकादमी यासारख्या अनेक संस्था आहेत‌. अस्थाई आणि अर्धस्थायी असणाऱ्या अनेक साहित्यसंस्था आहेत. याशिवाय मराठी साहित्याला हातभार लावण्यासाठी निर्माण झालेल्या अनियतकालीन संस्थाही अनेक आहेत. परंतु अमरदीप वानखडे यांच्या मार्गदर्शनांतर्गत मराठी साहित्य वार्ताने विकसित केलेले वेब पोर्टल जे काम करते आहे; आजवर असे काम क्वचितच कोणी केले असेल असे वाटते. या वेब पोर्टलशी जुळलेले सहयोगी साहित्यिक आणि अभ्यासक, वाचकांवर एक नजर टाकली तरी परदेशात मराठी साहित्यावर निष्ठेने काम करणाऱ्या एखाद्या साहित्यिकापर्यंत, कवी किंवा गझलकरापर्यंत हे पोर्टल पोहचले आहे असेच दिसेल. ‘मराठी साहित्य वार्ता’ची वार्ता खऱ्या अर्थाने जागतिक झाली आहे. जगामधल्या एखाद्या कोपर्‍यात कार्य करण्यासाठी वसलेल्या कवितेच्या अभयारण्यात किंवा एंड ऑफ आयडियालॉजी म्हणणाऱ्यांच्या युद्ध छावणीत बिगिनिंग ऑफ आयडियालॉजीचे गझलच्या संग्रामशीलतेतून हे पोर्टल बीज पेरीत असेलही; कोण जाणे. कारण कोणत्याही सज्जन वाचकाची दृष्टी तो पाहू शकत असेल तिथपर्यंतच जात असते. हा शाश्वत सत्याचा परीघ ओलांडण्यासाठी या वेब पोर्टलची निर्मिती झाली असावी असे वाटते.

मराठी साहित्य वार्ताच्या वेब पोर्टलचे संपादक मुख्य संपादक अमरदीप वानखडे यांचा सकाळीच मला फोन आला. त्यांना माझ्याशी काही चर्चा करायच्या होत्या. ते वेब पोर्टलवर प्रकाशित झालेले जे साहित्याच्या आणि भाषेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख आहेत; माझ्याकडे पाठवीत असतातच. त्यांनी पाठविलेले लेख मी नेहमीच वाचत असतो. प्रतिक्रियाही देत असतो. मी आंबेडकरवादी गझलकार आहे. आणि मी आंबेडकरवादी गझलवर संशोधन करीत आहे हे अमरदीपजींना माहीत आहे. माझ्याशी चर्चा करताना आंबेडकरवादी गझलवर तुमच्याकडून वेब पोर्टलसाठी लेख द्याल का? असे त्यांनी मला विचारले. मराठी साहित्याच्या परिप्रेक्ष्यात आंबेडकरवादी गझल तशी नवीनच आहे. त्यावर फारसे लेखन झाले नाही. गझलवर संशोधन करीत असताना डॉ. प्रतिभाताई वाघमारे, डॉ. प्रकाश राठोड असे मोजकेच संशोधक आंबेडकरवादी गझलवर काम करण्यासाठी माझ्याशी जुळलेले आहेत. आणखी काही समीक्षक जुळण्याची शक्यताही आहे. दहा-बारा वर्षांपासून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गझलांवर मी काम करीत आहे. वामनदादांना आंबेडकरवादी गझलचे जनक आहेत अशी संशोधनाच्या पातळीवर सैद्धांतिक मांडणी आम्ही करीत आहोत‌ याची कल्पना त्यांना होतीच. आंबेडकरवादी गझलेविषयीची त्यांची असलेली आपुलकीची भावना आणि या बाबत असलेल्या त्यांच्या दूरदृष्टीचा आदर करून मी त्यांना होकार दिला.

मराठी वाङ्मयात आंबेडकरवादी गझलचा उद्गम ही नावीन्यपूर्ण घटना आहे. तशी ही घटना कित्येक गझलकार साहित्यिकांना रुचली असेल किंवा नसेल याचा विचार न करता आंबेडकरवादी गझलेचा जाणते-अजाणतेपणी विचार व्हायला लागला हे मला जास्त महत्त्वाचे वाटते. आंबेडकरवादी गझलेवर मी २००८ साली पहिला लेख लिहिला. तोपर्यंत आंबेडकरवादी साहित्य ज्याला आपण एकेकाळी दलित साहित्य या नावाने संबोधित होतो, या साहित्यात आंबेडकरवादी गझलेचा उच्चारही झाला नव्हता. यातून मला कोणत्याही साहित्यिकावर टीका करायची नाही किंवा आरोपही करायचे नाहीत. गझलवर काही बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी गझलचा सर्वांगाने अभ्यास असणे आवश्यक असते. तशा अभ्यासाकडे आंबेडकरवादी साहित्यिकांचे, समीक्षकांचे दुर्लक्ष झाले होते हे मान्यच करायला पाहिजे. मी गझला लिहीत असल्यामुळे काही प्रमाणात गझलवर अभ्यास केला होता. सेतुमाधवराव पगडीजींचे ‘मिर्झा गालिब’, आनंद कुमार यांचे ‘गझलचे छंदशास्त्र’, दिवाळीअंक ‘आकंठ’ हा २००२ चा गझल विशेषांक, सुरेश भट साहेबांनी सांगितलेली गझलेची बाराखडी अशा काही पुस्तकांचा मी अभ्यास केला होता. गझल समजून घेतली होती.

वामनदादा या महाकवीने लिहिलेली गझल मी अनेक वर्षापासून गुणगुणत होतो. त्यावेळी ते गीत आहे असेच मी समजायचो. परंतु गझलचा अभ्यास करताना वामनदादांच्या मी म्हणत असलेल्या गीताची आठवण झाली आणि ती गझल आहे असे मी जाणकार आणि ज्येष्ठ साहित्यिकांना सांगता झालो. १५ में २००४ ला वामनदादांचे निधन झाल्यानंतर मात्र मला खूप दुःख झाले. त्यांच्या हयातीत वामनदादा गझलकार आहेत असे न सांगू शकल्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. त्या अस्वस्थतेतून त्यांचे प्रकाशित झालेले मिळेल ते गीतसंग्रह वाचलेत. त्या गीतसंग्रहातून गझला वेगळ्या केल्यात आणि ‘वामनदादा कर्डक : आंबेडकरवादी गझलेचा आरंभबिंदू’ या शीर्षकाचा लेख लिहिला. या लेखापासूनच खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी गझलेच्या संशोधनाला प्रारंभ झाला असे मी मानतो. पुढे डॉ. सागर जाधव आणि माधवराव गायकवाड यांनी वामनदादांच्या गीतांचे दोन खंड प्रकाशित केलेत. हे दोन खंड म्हणजे वामनदादांच्या गझलांवर काम करण्यासाठी मिळालेले ऊर्जास्तंभ आहेत. यातून ८६ गझला शोधून ‘संग्रामपिटक’ हा गझलसंग्रह प्रकाशित केला. ‘संग्रामपिटक’ मधील वामनदादांच्या गझलांचा संदर्भ घेत मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात कार्यरत असणारे प्रा. डॉ. महेंद्र भवरे यांनी ‘मराठीतील पहिला जदीदी आणि तरक्कीपसंद गझलकार वामनदादा कर्डक’ असा दीर्घ लेख लिहून प्रकाशित केला. त्यामुळे आंबेडकरवादी गझलेला चालना मिळाली.

२०१८ आणि २०१९ ला झालेल्या आंबेडकरवादी गझल संमेलनांनी आंबेडकरवादी गझल मराठी साहित्य क्षेत्रात पोहोचविण्यासाठी हातभार लागला. त्यातच ‘आंबेडकरवादी गझलवेध’ आणि ‘वामनदादा कर्डक : आंबेडकरवादी गझलेचा आकृतिबंध’ अशी दोन पुस्तके प्रकाशित झालीत. त्यामुळे गझलवर करीत असलेल्या कामाला गती प्राप्त झाली. याचा परिणाम मराठी साहित्यात आंबेडकरवादी गझलेची चर्चा होण्यात झाला. अनेक गझलकार, समीक्षक आता या गझलेशी जुळत आहेत. साहित्य संशोधनाची दृष्टी असणाऱ्या भगिनी डॉ. प्रतिभाताई वाघमारे – खोब्रागडे यांचा ‘वामनदादांच्या गझलांचे सौंदर्यविश्व’ असा अभ्यासपूर्ण संशोधनग्रंथ प्रकाशित होत आहे. त्यामुळे आंबेडकरवादी गझल हा मराठी आणि आंबेडकरवादी साहित्यात चर्चेचा विषय ठरत आहे, हे सांगताना मी करीत असलेल्या कार्याची फलश्रुती मिळत असल्याचा आनंद मला सततच ऊर्जा देत राहील असा विश्वास वाटतो.
(क्रमशः)

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles