लोकसंवादसाप्ताहिक सदरसाहित्य प्रकार

आंबेडकरवादी गझलेचा आकृतिबंध : प्रमोद वाळके ‘युगंधर’

"आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य" हे साप्ताहिक सदर आम्ही मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी सुरू केले आहे. दर रविवारी प्रसिद्ध होणा-या या सदरामधून ज्येष्ठ आंबेडकरवादी गझलकार प्रमोद वाळके "युगंधर" आणि आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. प्रकाश राठोड आंबेडकरवादी गझलेच्या संदर्भाने भूमिका मांडणार आहेत. आपण सर्व या नव्या सदराचे निश्चित स्वागत कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले काही प्रश्न असल्यास मराठी साहित्य वार्ताला जरूर कळवा अथवा खाली लेखकांचा संपर्क दिला आहे. त्यावर आपण आपल्या प्रतिक्रिया द्याव्या - संपादक

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य – भाग ४

मराठी आणि उर्दू गझलविषयी अत्रतत्र चर्चा होतच आहेत. त्यामुळे मराठी आणि उर्दू गझलांच्या संदर्भात आणखी माहिती न देता आंबेडकरवादी गझलविषयी काही स्पष्टीकरणे देणे उचित ठरेल. आंबेडकरवादी गझल गझलकारांच्या अनुभवातून आलेली असते. तशी प्रत्येकच गझल अनुभवातूनच आलेली असते परंतु आंबेडकरवादी गझलेत भावविवशता फारशी असत नाही. ही गझल अनुभवसिद्ध शब्दांनी आशयसौंदर्याचा प्रत्यय वाचकांना देत असते. कारण आशयसौंदर्याने संपृक्त असलेल्या शब्दांचे नियोजन गझलांमधून केले असते. हे आशयसौंदर्य जीवनाशी आणि जगण्याशी निगडित असते. त्यामुळे ऐकणाऱ्यांच्या मनाचे पूर्ण समाधान होत असते. गझलमधून येणारे शब्द, त्यांचा आशय, त्यातील लक्षार्थ आणि व्यंजकता लक्षात घेतली तर ही गझल मनाचे शुद्धीकरणच एका अर्थाने करीत असते असे दिसते. अशी गझल प्रथमतः वामनदादांनी लिहिली. आंबेडकरवादी गझल आधुनिक भांडवलशाहीचे तत्त्वज्ञान मांडत नाही. एकलहितलक्षी परिवर्तन आंबेडकरवादी गझलला मान्य नसते.

 

नैसर्गिकतेच्या विरोधात जाणारी सवय आंबेडकरवादी गझलेस असत नाही. आंबेडकरवादी गझलेचे प्रमाणशास्त्र आंबेडकरवाद आहे. आंबेडकरवाद या गझलेने स्वीकारला असल्यामुळे गझलेतून येणाऱ्या शब्दांत संविधानाच्या प्रिॲंबलमधून ऊर्जावर्धित झालेल्या परिवर्तनाचा सिद्धान्त, एकसंधतेची भावना, धर्मनिरपेक्षता हा मुख्य गाभा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, बुद्धिवाद आणि विज्ञाननिष्ठा, सौहार्द, सर्जनशीलता, सहिष्णुता ही आंबेडकरवादी गझलमधील प्रबोधनाच्या तत्त्वज्ञानाची नियमावली आहे. या गझलेत बाबासाहेबांनी लिहिलेले ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आहे. रिव्ह्याल्युशन ॲंड काऊंटर रिव्ह्याल्युशन आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. अलीकडे दुर्मिळ होत चाललेली मानवी मनाची मंगलमय अवस्था आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा समाजवादही आहे. या गझलेचे अन्वेषण करताना, समजून घेताना वाच्यार्थाकडे एक वेळ लक्ष दिले नाही तरी चालेल. परंतु लक्षार्थाकडे बघितले तर परिवर्तनाच्या निंदासूचक अर्थाचे नगारे ही गझल वाजवत बसत नाही असेच दिसेल. आंबेडकरवादी गझलमधील हे विज्डम आहे.

 

आंबेडकरवादी गझल म्हणजे गझलची उजेडवाट. आंबेडकरवादी गझल म्हणजे मानवीमूल्यांची सौंदर्यभूमी स्वीकारलेली व्रुत्तरचना. आंबेडकरवादी गझल म्हणजे प्रज्ञानदृष्टी आणि युगप्रवर्तक दृष्टीचा संवेदनशील स्वभाव असणारा आकृतिबंध. आंबेडकरवादी गझल म्हणजे मानवतेचे अर्थसौंदर्य. त्यामुळे आंबेडकरवादी गझल काळाची आवश्यकता झाली आहे. भारतीय सम्यक समाजाच्या वातावरणात होणारे बदल नेमकेपणाने हेरून त्यावर प्रहार करण्याचे सामर्थ्य केवळच आंबेडकरवादी गझलेत असल्यामुळे आंबेडकरवादी गझलची चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आंबेडकरवादी गझलमध्ये फक्त वंचितांचे दुःख अनुष्ठानित होत नाही तर राजकीय, सामाजिक, आर्थिक, स्त्रीवादी जाणिवा आणि भूमिका घेऊन एकाच गझलेत द्विपदी येतात आणि एकाच गझलमधून वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनावर प्रभाव निर्माण करण्यात गझलकार यशस्वी होतात. असे फक्त उर्दू गझलमधून होते. आजच्या बदलत्या वातावरणात उर्दू गझल आणि आंबेडकरवादी गझलने एकसंधपणाची भूमिका स्वीकारली तर निर्माण झालेले वातावरण बदलू शकते यावर विश्वास ठेवायला मोठा स्पेस आहे. आंबेडकरवादी गझल नव्यानेच श्रोत्यांपर्यंत जात असल्यामुळे आंबेडकरवादी गझलचा आकृतिबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

आकृतिबंध म्हणजे आरेखन किंवा आराखडा. “कलाकृतीचा प्रत्यक्ष आविष्कार तिच्यातील विविध घटकांच्या ज्या समुचित संश्लेषणातून साधला जातो, त्या संश्लेषणाचे स्थूल व प्राथमिक आरेखन किंवा शीघ्ररेखन म्हणजे आकृतिबंध होय.” असे श्रेष्ठ समीक्षक रा. ग. जाधव म्हणतात. गझलमधून येणारे छंद, गण, मात्रा, अलामत, काफिया, रदीफ, यती हे त्या-त्या गझलचे आरेखन असते. या आरेखनाद्वारेच गझलेचा आकृतिबंध तयार होतो. गझलमध्ये वरील गोष्टींची सुस्पष्ट मांडणी असणे आवश्यक असते. एखाद्या गणात अक्षरांचा फेरबदल झाला तरी किंवा काफिया, रदीफच्या नियोजनात बदल झाला तरी या गझलच्या एकूणच आकृतिबंधात अडथळा निर्माण होत असतो आणि ती गझल गझल वाटत नाही. आंबेडकरवादी गझलेतही असेच होते. गझलकारांच्या गझलेत जाणवणारा आकृतिबंध स्वयंनिर्मित असतो. प्रत्येकवेळी त्याच्या अनुभूतीप्रमाणे तो आकृतिबंधात बदल करीत असतो. त्यामुळेच गझलकाराने लिहिलेली प्रत्येक गझल वेगळी वाटते. त्यातील भावाशय वेगळा वाटतो.

 

आकृतिबंधाचे नाते त्या त्या वृत्ताशी जुळले असते. जेवढे वृत्तांचे प्रकार आहेत तेवढे आकृतिबंध आहेत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आंबेडकरवादी गझल प्रचलित वृत्तांमध्ये लिहिली जात असताना मराठी गझलपेक्षा आंबेडकरवादी गझलेची उपज वेगळी आहे असे दिसते. त्यात येणाऱ्या प्रतिमा, प्रतीके, भावाभिव्यक्ती वेगळी असल्यामुळे आणि मुख्यता विचारांची सुस्पष्टता असल्यामुळेच ही गझल वेगळी ठरते आहे. आंबेडकरवादी गझल परिवर्तनाची गझल आहे. तिला साचलेपणा आवडत नाही. ती जागतिकीकरणाच्या लढ्यात सहभागी होते. आंबेडकरवादी गझल माणुसकीच्या लढ्यात मेजरचा रोल करते. उत्थानाचा मार्ग दाखवणारी ही गझल आहे. मानवी मनाच्या अकुशलतेवर ती प्रहार करते. मानवी मनातील अंधार चीरणारी मशाल होणे ती स्वतःचे कर्तव्य समझते. बुद्धाची करुणा पेरणारी ही गझल आहे‌. कष्टकरी माणसांच्या दुःखाचे प्रकाशन करण्यासाठी प्रकाशवृक्ष होऊन धम्माच्या अनुशासनाची प्रस्थापना करणे तिला आवडते. आंबेडकरवादी गझल दुःखमुक्तीसाठी लढणाऱ्या क्रांतिमार्गाची गझल आहे. एका अर्थाने ती संग्रामगझल आहे. मनुष्यतेला दुःख देणारे विकार ती कांडते. आंबेडकरवादी गझल उड्डाणाची दिशा निश्चित करणारी आहे. त्यामुळेही ही गझल वेगळी ठरते असे माझे स्पष्ट मत आहे.

(क्रमशः)

प्रमोद वाळके ‘युगंधर’,
नागपुर
संपर्क – ८३२९३७४९९६

आणखी संबंधित लेख

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

4 Comments

 1. प्रमोददादा वाळके ,
  आंबेडकरवादी गझलविषयक आपली ही लेखमालिका अप्रतिम होते आहे. लेखमाला वाचतांना आपले अविश्रांत श्रम , आपला एकूणच गझलच्या संदर्भात सखोल अभ्यास , आंबेडकरवादी गझलसंबंधी चिंतन , सुनिश्चित दृष्टी , चळवळीवरील निष्ठा आणि हाती घेतलेल्या उपक्रमाविषयी सुस्पष्ट बांधीलकी इत्यादी प्रस्तुत लेखमालिकेतून आंबेडकरवादी गझलपथावर भक्कम पाऊलखुणा उमटवित आहे.
  यामुळे आंबेडकरवादी गझलकार , अभ्यासक , समीक्षक या सर्वांना आंबेडकरवादी गझल साकल्याने समजून घ्यायला मदत होईल आणि आंबेडकरवादी गझल चळवळीची वाट अधिक प्रशस्त करण्यास देखील ही लेखमालिका नि:संशय उपयुक्त ठरेल.
  – अशोक बुरबुरे

 2. आदरणीय प्रमोद वाळके सर , जय भीम !
  आजचाही लेख अगदी काळजातून आलेला आहे , यात लेखात आपले परिश्रम , गाढा अभ्यास आणि आंबेडकरवादी गझले वरील आपली निष्ठा ठायी ठायी आढळून येत आहे . आपल्या परिश्रमाच्या फलश्रुती स्वरुपात मराठी गझलेचा संपूर्ण आकृतीबंध कायम राखून संपूर्ण शोषित समाजाचे प्रतिनिधित्व पुढे चालून केेेेेेवळ आंबेडकरवादी गझले मार्फत हमखास होईल यात दुमत नसावे .आजची तरूण पिढी आंबेडकरवादी गझले कडे आकृष्ट होत असल्याचे जे आशादायक चित्र आज पहायला मिळत आहे , यात आपल्या या अभियानाचा मोठा वाटा आहे .
  मनःपूर्वक अभिनंदन सर !

 3. प्रमोद वाळके ‘युगंधर’ हे केवळ आंबेडकरवादी गझलेचे भाष्यकार नाहीत; तर आंबेडकरवादी गझलेचे यथार्थ निराळेपण सांगणारे कवी-समीक्षक आहेत.’आंबेडकरवादी गझलेचा आकृतिबंध’ या लेखात लेखकाने आंबेडकरवादी गझलेचे नेटके प्रयोजन सांगताना माणुसकीचे सर्जन करणारी देखणी वैशिष्टेही प्रतिपादित केलेली आहेत. आंबेडकरवादी गझलेचे नाते बुद्ध नि बाबासाहेब यांच्यामध्ये असणाऱ्या करुणेशी ते थेट जोडतात. म्हणजेच गझलेची भाषा ही मानवतेला सुप्रतिष्ठित करणारी असते हे त्यांचे म्हणणे यासंदर्भात विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. आंबेडकरवादी गझलेविषयीची त्यांची समज अत्यंत प्रगल्भ असून नवे सिद्धांत अधोरेखित करणारी आहे. भाषिकदृष्ट्याही लेखकाने केलेले विवेचन गझलेसंबंधीच्या परंपरागत धारणा मोडीत काढणारे आहे आणि नव्या सौंदर्यसिद्धांताची अपेक्षा व्यक्त करणारे आहे. एकूणच त्यांचा हा लेख मूल्यगर्भ जाणिवा प्रकाशित करणारा आहे. चिंतनशीलता हे या लेखनाचे मध्यवर्ती सूत्र आहे.

  डॉ. अनमोल शेंडे, समीक्षक

 4. आदरणीय सर,
  आंबेडकरवादी गझलचा आकृतिबंध हा लेख सुरेख आहे .एक चांगली मांडणी यानिमित्ताने आपण करता आहात .याचा आजच्या व भविष्यकालीन पिढीला निश्चितच आंबेडकरवादी गझल समजून घेताना उपयोग होणार आहे .मराठी काव्यप्रांतात व आंबेडकरवादी साहित्यात हा काव्याचाच प्रकार खरे तर उपेक्षित , उपरा समजला गेला . परंतु या काव्यप्रकारात एकदा आकृतिबंधाबाबतची मास्टरकी संपादन केली की हा गझल काव्यप्रकार सहज , सोपा वाटू लागतो . फक़्त अंबेडकरवादी जाणिवेचा व नेणिवेचा पीळदार आशयच या आकृतिबंधाला जिवंत ठेवतो आणि या आकृतिबंधाचे जीवनसौंदर्यही वाढवितो . आकृतिबंधाची जितकी समज चांगली तितकीच किंवा त्यापेक्षा अधिक त्या आकृतिबंधात कोणता आशय कसा बांधायचा याची देखिल समज असणे आवश्यक आहे . त्यासाठी समाजजीवन उकळून पिणे अर्थात जगणे आणि त्या जीवन जगण्यावर निष्ठेने प्रेम करणे आणि त्या जीवन जगण्याचा आंबेडकरवादी जीवनदृष्टीतून अन्वय व अन्वयार्थ लावणे . जीवन जगण्याचा सापडलेला इत्यर्थ किंवा साररूपी निष्कर्ष हा त्या गझल काव्याच्या आकृतिबंधातून ध्येय दिशेनुसार साकारणे आवश्यक आहे . गझलचा आकृतिबंध हा आशयाला जोडून किंवा सामावून घेणारा आहे .तो आशयाला तोडणारा नाही. उलट तो जोडणारा आहे. एकजिनसीपणाची क्षमता , ताकद दर्शविणारा आहे . आकृतिबंधाची ही क्षमता आकृतिबंधासह त्या आकृतिबंधातून वाहणाऱ्या आशयालाही श्रीमंत करणारी आहे .आकृतिबंध म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ते बंधनयुक्त / नियमयुक्त स्वातंत्र्य आहे असे म्हणता येईल. निसर्ग हा सुद्धा बंधनानी किंवा नियमांनी युक्त असा आहे . निसर्गातील सर्व बदल हे नैसर्गिक नियमांनीच होत आले व होत राहणार आहेत .निसर्गाला नियम असतील तर गझल या काव्यप्रकाराला नियम/ बंधने असले तर बिघडले कुठे ? बंधनातही मुक्तता असते आणि मुक्ततेतही बंधन असते . या दृष्टीने आंबेडकरवादी गझलेचा आकृतिबंध हा बंधमुक्तही आहे आणि तो मुक्तबंधही आहे .याचाच अर्थ ते आशयाच्या अभिव्यक्तीचे बंधनयुक्त स्वातंत्र्यच आहे .असा आंबेडकरवादी गझलचा आकृतिबंध आशयाभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राखणाराही आहे आणि या आकृतिबंधाच्या बंधनात राहूनच स्वातंत्र्य जपणाराही आहे .त्यामुळे या आंबेडकरवादी गझलच्या आकृतीबंधाकडे स्वातंत्र्याच्या नजरेतून बघितले की हा आकृतिबंध आपल्या पोटात स्वातंत्र्य हे मूल्ये वागवितो हे कळते . हे मूल्ये का वागवितो ? तर या मूल्याला समता , बंधूता आणि न्याय या मूल्ये स्तंभावर भारतीय समाजाची पुनर्रचना करावयाची आहे .या आकृतिबंधातील स्वातंत्र्य हे समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची उपज करणारे आहे .आंबेडकरवादी गझलेचा हा आकृतिबंध स्वातंत्र्योपासक असून तो मानवी विवेकबुद्धीला चालना देणारा आहे . त्यामुळे गझलच्या या आकृतिबंधाला कोणीही कृत्रिम मानता कामा नये .उलट हा आकृतिबंध विवेकबुद्धीला मोकळीक देणारा असल्याने तो सर्जनशील स्वरूपाचा ठरणारा आहे .अशा सर्जनशील उजेडाची प्रकृती असलेला आकृतिबंध हा नव्या सर्जनशील आशय विश्वालाही नवे सौंदर्य देणारा आहे .असा हा आंबेडकरवादी गझलेचा आकृतिबंध हा आशयाचा कोंडमारा करणारा नाही किंवा तो कोंडणाराही / गज्येघाटही नाही .तो आपल्या पोटात आशयाला मूक्त स्वातंत्र्य देणारा आहे .आंबेडकरवादाची पूर्व अट स्वातंत्र्यच आहे . मग हे स्वातंत्र्य मनाचे असो की बाह्यगत असो .या स्वातंत्र्याशिवाय भारतीय समाजजीवनाची पुनर्रचनाही करणे हे लक्षही दूरचेच राहणार आहे .आंबेडकरवादाचे भारतीय समाजजीवनाच्या पुनर्रचनेचे ध्येय ,साधनभूत असलेल्या या गझलेच्या आकृतिबंधाचेच ध्येय आहे .हे या आकृतीबंधाच्या मूळ प्रकृती वैभवात असलेल्या स्वातंत्र्याद्वारे समजते .हा आंबेडकरवादी आकृतिबंध स्वातंत्र्याची प्रकृती जोपासत आंबेडकरवादी गझलविश्वातून आंबेडकरवादाचे मानव मुक्तीचे , शोषणमुक्तीचे , मानवी पुनर्रचनेचे ध्येय साकारणारा आहे . आंबेडकरवादी गझलकार , समीक्षक युगधंर प्रमोद वाळके सर यांच्या गझलमय जीवनकार्य शब्दातीत असेच आहे .

  डॉ . युवराज मानकर
  मो . ९८९०४६७६१३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close