कथासाप्ताहिक सदरसाहित्य प्रकार

आंबेडकरवादी गझल समजून घेताना… – प्रमोद वाळके ‘युगंधर’

"आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य" हे साप्ताहिक सदर आम्ही मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी सुरू केले आहे. दर रविवारी प्रसिद्ध होणा-या या सदरामधून ज्येष्ठ आंबेडकरवादी गझलकार प्रमोद वाळके "युगंधर" आणि आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. प्रकाश राठोड आंबेडकरवादी गझलेच्या संदर्भाने भूमिका मांडणार आहेत. आपण सर्व या नव्या सदराचे निश्चित स्वागत कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले काही प्रश्न असल्यास मराठी साहित्य वार्ताला जरूर कळवा अथवा खाली लेखकांचा संपर्क दिला आहे. त्यावर आपण आपल्या प्रतिक्रिया द्याव्या - संपादक

आंबेडकरवादी गझल समजून घेताना…

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य – भाग २

आंबेडकरवादी गझल समजून घेताना आंबेडकरवाद म्हणजे काय हे पाहणे उचित ठरेल. कारण आंबेडकरवादी गझल आंबेडकरवादावरच उभी ठाकली आहे. आंबेडकरवाद हे या गझलेचे प्रमाणशास्त्र आहे. आंबेडकरवादाची व्याख्या काही साहित्यिकांनी केली आहे, ती खाली देत आहे. या मान्यवरांच्या व्याख्यांद्वारे आंबेडकरवाद समजून घेण्यास मदत होईल. आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

डॉ. यशवंत मनोहर म्हणतात…
“आंबेडकरवाद हे मानवी जीवनाची पुनर्रचना करणारे शास्त्र आहे.”
मानवी जीवनाची पुनर्रचना यातच सम्यक विचारांची सूत्रे आहेत. सम्यक म्हणजे योग्य. ज्या विचारांमध्ये स्पष्टता आहे असा संपूर्ण विचार. जीवनाची पुनर्रचना करताना तो विचार योग्य आहे की अयोग्य आहे याची पडताळणी करूनच जीवनाची पुनर्रचना करावी लागते. पुनर्रचना म्हणजे रिकन्स्ट्रक्शन. जीवनाची नव्याने उभारणी करणे म्हणजेच आपल्या जीवनात आलेल्या तकलादू गोष्टी टाकून देणे. नेस्तनाबूत करणे. विरचित करणे. याचा अर्थ जीवन जगत असताना मनात असलेल्या तृष्णेचा त्याग करणे. वाईट चालीरीतींचा त्याग करणे. रूढी, परंपरांचा त्याग करणे. अंधश्रद्धेचा त्याग करणे आणि आपला उदरनिर्वाह, आपले कर्म, आपले वर्तन, दृष्टी, आचरण, प्रवृत्ती, वाणी, निश्चय, स्मरण, एकाग्रता, ज्ञान, आपण करीत असलेल्या कामाचे प्रयत्न सम्यक मार्गानेच केले पाहिजे. योग्य मार्गाने केले पाहिजे. हाच जीवनाच्या पुनर्रचनेचा सिद्धांत आहे. जीवनाच्या पुनर्रचनेचा सिद्धांत म्हणजे आंबेडकरवाद होय. आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

डॉ. प्रकाश राठोड या समीक्षकांनी आंबेडकरवादाची व्याख्या केली आहे. ते म्हणतात…
“आंबेडकरवाद म्हणजे अखिल मानवजातीच्या सर्वकल्याणाचे बुद्धिवादी तत्त्वज्ञान आहे.”

समीक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेशित होणारे डॉ. सर्जनादित्य मनोहर यांनीही आंबेडकरवादाची व्याख्या केली आहे. ते म्हणतात…
“आंबेडकरवाद म्हणजे मानवीजीवनाच्या सर्वंकष शोषणमुक्तीचे प्रयोगशील तत्त्वज्ञान होय.”

डॉ. प्रकाश राठोड म्हणतात त्याप्रमाणे सर्वकल्याणाचे तत्त्वज्ञान वैश्विकच असते. विश्वाचे कल्याण व्हावे असा विश्वास देणारा आंबेडकरवाद आहे. आपल्या जीवनशैलीत बदल करायचा असेल तर आंबेडकरवादात सांगितलेली सूत्रे आणि विश्वकल्याणाची संहित घेऊनच विषमताधिष्ठित समाजाची पुनर्रचना करणे क्रमप्राप्त ठरते. आपल्या मनावर असलेले विषमताधिष्ठित विचारांचे ओझे उतरवून आंबेडकरवादाच्या विचारसूत्रानुसार मनाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. तेव्हाच डॉ. सर्जनदित्य मनोहर म्हणतात त्याप्रमाणे समाज शोषणमुक्त होईल. हे शोषणमुक्तीचे तत्त्वज्ञान ज्या गझलमध्ये आहे ती आंबेडकरवादी गझल आहे असे म्हणता येईल. जीवनाची पुनर्रचना करण्यासाठी, मानवजातीच्या सर्वकल्याणाचा विचार करण्यासाठी किंवा मानवीजीवन शोषणमुक्त होण्यासाठी माणूस प्रयोगशील असला पाहिजे. हे प्रयोग धार्मिकतेचे नसतात.

मनामनात दुफळी किंवा तेढ निर्माण करणारे नसतात. तेढ निर्माण करणाऱ्या प्रयोगांना धार्मिक पुनरुज्जीवन करणारे प्रयोग म्हणतात. असे प्रयोग करणे मनुष्यतेला हानिकारक असतात. असे धार्मिक पुनरुज्जीवन करणारे प्रयोग या भारत देशात सध्यकालीन स्थितीत वाढत आहेत. अशा प्रयोगांवर मात करण्यासाठी आंबेडकरवादाची गरज आहे. कारण आंबेडकरवादाची वृत्ती निरपेक्ष आहे. त्यात सर्वकल्याणकारी भूमिका आहे. अशा भूमिकेतूनच स्वातंत्र्याचे आंदोलन उभे झाले होते; हे आपण विसरता कामा नये. स्वातंत्र्याचे आंदोलन मनाची पुनर्रचना झाल्यामुळेच उभे राहिले हे आपण लक्षात घेतले पाहिजे. गुलाम मानसिकतेतून बाहेर पडलेल्या मनानेच हे आंदोलन केले होते. तो स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेला प्रयोगच होता. तो प्रयोग यशस्वी झाला आणि देश स्वतंत्र झाला. हीच स्वतंत्रतेची भूमिका आपण आजच्या स्थितीत पार पाडायला पाहिजे. कारण आजचे वातावरण संविधानाच्या प्रिॲम्बलची उपयोगिता नष्ट करण्याकडे झुकणारे आहे.

ज्यांनी संविधानाच्या प्रिॲम्बलची सुरक्षितता जपली पाहिजे, जोपासली पाहिजे तेच मुळी आपापसात भांडत आहेत. त्यामुळे सामान्य जीवनाची मानसिकताच ढासळून गेली आहे. मानसिकता ढासळणे भारतीयांच्या आचारसंहितेला फायदेशीर नाही. यामुळे भारतीयांचा विकास होत नाही. भारतीय मानसिकतेचे एकसंधत्व बाबासाहेबांना हवे होते. भारतीयांच्या मनात एकसंधत्वाची जाणीव असणे म्हणजे ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे’ ही मानसिकता वृद्धिंगत होणेच आहे. अशी एकसंधत्वाची भावना नसल्यामुळे माॅब लिंचींग, ‘स्त्री’ला नग्न करून तिची धिंड काढण्याचे प्रकार सर्रास घडताना आपण ऐकतो आहोत. विभक्तपणाची भावना मोठ्या प्रमाणात लोकांच्या डोक्यात रुजविली जाणे भारतीयत्वासाठी सोयीचे नाही. आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

मानवीजीवनाचे तत्त्वज्ञान स्वीकारणे ही संविधानसंस्कृतीची रुजवणूक आहे. संविधानसंस्कृतीची प्रस्थापना करणे याचा अर्थ माणसाच्या उत्थानाच्या प्रक्रियेला गती देणे असा आहे. प्रवाहित करणेच असा आहे. यातून मानवाच्या सर्वकल्याणकारी जीवनाच्या पहाटेचा सूर्य उगवत असतो. पुनर्रचना करणारे मन वैज्ञानिकच असते. ती मनाच्या वैज्ञानिक संरचनेची संहिता असते. ही संहिता म्हणजेच आंबेडकरवाद होय. हे तत्त्वज्ञान प्रमाण मानून लिहिलेली गझल आंबेडकरवादी गझल ठरते. हे तत्त्वज्ञान जात, पंथ, धर्म, प्रांत, विकार विरहित असते. हे तत्त्वज्ञान असीम आहे. कारण प्रयोगशीलतेचा या तत्त्वज्ञानाला सुगंध येतो. हे तत्त्वज्ञान स्थिर नसते. प्रवाही असते. डॉ. यशवंत मनोहर, डॉ. प्रकाश राठोड आणि डॉ. सर्जनादित्य यांनी आंबेडकरवादाच्या केलेल्या व्याख्या तपासल्या तर शोषणमुक्ती हे समानसूत्र त्यात दिसून येते. मुख्यता मानवीजीवनाची पुनर्रचना करण्यासाठीच संविधानाने दिलेल्या मानवीमूल्यांची प्रस्थापना करणे अगत्याचे ठरते. यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना या मूल्यांना महत्तम महत्त्व दिले आहे. या संविधानमूल्यांचा ज्या गझलमधून उद्गार उमटत असेल, जागर होत असेल ती आंबेडकरवादी गझल आहे असे समजावे. या गझलेने संविधानमूल्ये स्वीकारली असल्याने आंबेडकरवादी गझलेचे गाभातत्व जात्यतीत, धर्मातीत समाजाची निर्मिती करणे हेच आहे.

त्यामुळे आंबेडकरवादी गझल मानवीजीवनाचे नवनिर्माण करणारी प्रयोगशाळाच आहे. आंबेडकरवादी गझल लिहिणाऱ्यांच्या गझलांमधून जीवनाच्या परमसौंदर्याच्या आविष्काराची उत्कट अनुभूती गझल वाचताना किंवा ऐकताना आपणास मिळत असते. आंबेडकरवादी गझलमधून येणारी द्विपदी मनाची पुनर्रचना करणाऱ्या आंदोलनातील वेगळे विषय घेऊन येत असली तरी त्यात जीवनाची सौंदर्यमयताच शब्दान्वित केली असते. जशी मराठी गझल कवितेची कविता आहे तशी आंबेडकरवादी गझल जीवनाची कविता आहे असे त्यापुढे जाऊन मी म्हणेन.

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

(क्रमशः)

शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

12 Comments

 1. मराठी साहित्य वार्ता द्वारे साप्ताहिक सदर आंबेडकरवादी गझल समजून घेताना या मुख्य विषयाच्या अनुरोधाने आंबेडकरवादी गझलेची सैद्धांतिक , अतिशय चिंतनगर्भ मांडणी करणारे आंबेडकरवादी गझलकार , जेष्ठ अभ्यासक युगंधर प्रमोद वाळके यांचे हे लेखन नवे आणि ऐतिहासिक असे आहे .नव्या वाटा शोधणाऱ्यांना एक नवी दिशा देणारे आहे . गझल समीक्षक अथवा आंबेडकरवादी समीक्षक संशोधक असो यांचे आता पर्यत आंबेडकरवादी गझलकडे दुर्लक्ष झालेले आहे .अशा दुर्लक्षीत झालेल्या आंबेडकरवादी साहित्यातील गझल प्रांताला ते यानिमित्ताने उजेडात आणत आहे . आंबेडकरवादी नामाभिधान घेऊन ही गझल झंझावाताप्रमाणे मार्गक्रमण करत आहे .ही गझल आंबेडकरवादी नाममुद्रा धारण करून भारतीय गझल प्रांतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे .युगंधर प्रमोद वाळके यांच्या या असीम निष्ठेची ,त्यांच्या गझलमय व्यक्तित्वाची आणि त्यांच्या या ऐतिहासिक कार्याची नोंद इतिहास कधी विसरणार नाही .त्यांचे हे कार्य वर्तमानाला दिशा देत भविष्यातील विकासाला हाका मारणारे आहे .

  1. धन्यवाद डॉ. युवराज मानकर जी. आपण दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मला अधिकाधिक अध्ययन आणि अध्यापनासाठी ऊर्जा मिळाली आहे.

 2. अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख सरजी ! अन्यायाचा विरोध करणारी , बौद्धिकतेची कास धरणारी , विषमतेवर बोट ठेवणारी आणि संविधानाला संपूर्ण पणे वाहून घेणारी गझल म्हणजे आंबेडकरी गझल .
  आदरणीय प्रमोद वाळके सरांनी अतिशय महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे , या बद्दल त्यांंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उपक्रमाला अनेक शुभेच्छा !

  1. धन्यवाद डॉ. युवराज मानकर जी. आपण दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मला अधिकाधिक अध्ययन आणि अध्यापनासाठी ऊर्जा मिळाली आहे.

 3. अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख सरजी !अन्यायाचाविरोध करणारी , बौद्धिकतेची कास धरणारी , समाजाच्या शोषण मुक्तीचा पाठपुरावा करणारी गझल म्हणजे आंबेडकरी गझल अगदी यथार्थ वर्णन केले आहे सरजी .
  आजच्या काळात फारच महत्वाचा आणि उपयुक्त उपक्रम आदरणीय प्रमोद वाळके सरांनी हाती घेतला आहे , सरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उपक्रमाला अनेक शुभेच्छा !

  1. मनापासून धन्यवाद मसूदजी मला सदिच्छा दिल्याबद्दल.

 4. “आंबेडकरवादी गझलेचे सर्जनसौंदर्य, भाग-२ च्या निमित्ताने…
  माणसाने माणसासारखं जगण्याचे आणि जीवन जगत असताना समाज आणि राष्ट्राच्या हिताचा विचार करणे आणि प्रसंगी अन्यायाविरुद्ध पेटून उठणे शिकवणारे शास्त्र म्हणजेच आंबेडकरवाद होय. आंबेडकरवाद हा समानतेचा पुरस्कार करीत असल्यामुळे आंबेडकरवादी गझल लिहिताना प्रामुख्याने मानवी मुल्य जपणाऱ्या, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या त्रीसुत्रांचा विचार जनमानसांत रुजविणारी असली पाहिजे. हेच आंबेडकरवादी गझलेचे सौंदर्यशास्त्र आहे असे सुंदर विवेचन प्रमोद वाळके ‘युगंधर’ ह्यांनी आंबेडकरवादी गझल समजून घेताना… ह्या सदरातील “आंबेडकरवादी गझलेचे सर्जनसौंदर्य, भाग-२ मधे केले आहे. आंबेडकरवादी गझलकार प्रमोद वाळके ‘युगंधर’ ह्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि चिकित्सक दृष्टी ह्यातून पुन्हा एकदा मला अनुभवता आली. खूप खूप अभिनंदन आणि सदिच्छा!

  – गंगाधर मेश्राम
  ०६/१०/२०

 5. अत्यंत जबाबदारीने ही मांडणी होत असल्याचा प्रत्यय वाचतांना येतो…खरे तर आंबेडकरवादी साहित्याच्या परिक्षेत्रातही कालपर्यंत…गझल या काव्यविधेकडे उपेक्षेनेच पाहिले गेले. पण आज गझलला प्रतिष्ठा आणि सन्मानाची वागणूक मिळत आहे. नवी पिढी आपल्या सळसळत्या उत्साहाने गझल लेखन करीत आहे, संवैधानिक मूल्यांचा जागर अनेक गझलकारांच्या रचनेमधून होत आहे. आंबेडकरी गझल समृध्द होत असल्याचीच ही पावती आहे.
  या निर्णायक वळणावर युगंधर गझलकार तथा आंबेडकरवादी गझल दृष्टीचे चिकित्सक आद. प्रमोदजी वाळके यांनी आंबेडकरी गझल समजून घेताना … मराठी साहित्य वार्ता सदरात जी एकूणच मांडणी केली आहे, ती मराठी गझलेचे निदान करणारी तर आहेच‌ पण आबेंडकरी गझलेचे अंतरंग उलगडून दाखवणारी आहे. त्यांच्या प्रयोगशाळेचा मी देखिल एक विद्यार्थी आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यांच्या या कार्यासाठी व संकल्पपुर्तीसाठी मी त्यांना असिम सदिच्छा देतो.

  विनोद बुरबुरे

 6. मनापासून धन्यवाद मसूदजी मला सदिच्छा दिल्याबद्दल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close