लोकसंवाद

आदिवासी कोकणा-कोकणी बोली आणि लोकवाङ्मय – प्रतिभा रामदास देशमुख चौरे

लेखिका पीएच. डी. च्या संशोधक विद्यार्थीनी आहेत.

      ‘आदिवासी कोकणा-कोकणी’ ही एक ४५ आदिवासी जमातींपैकी एक महत्त्वपूर्ण व लोकसंख्येच्या दृष्टीने दुस-या क्रमांकावर आहे. महात्मा फुले यांच्या मतानुसार भारतातील आदिवासी हे मूलनिवासी आहेत. त्यांना ‘जंगलाचा राजा’ म्हणूनच संबोधले जाते. जितकी आदिवासी समाजाची प्राचीनता, ऐतिहासिकता तितके त्यांचे लोकसाहित्य ही प्राचीन आहे. आदिवासी लोककला, लोकसंस्कृती, लोकसाहित्य (लोककथा लोकनृत्य ) त्यांचा आहार, जीवनमान हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचे सर्व लोकसाहित्य हे मौखिक स्वरूपामध्ये एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित होत गेले आहे. ‘आदिवासी आणि निसर्ग’ यांचे एक अतूट नाते आहे. मूळ कोकणा-कोकणी समाज हा कोकण किनारपट्टी येथूनच ‘दुर्गा दुष्काळ’ ज्यावेळेस पडला होता, त्यावेळेस सन १३९६- १४०८ या काळात ते उत्तरेकडे सरकले. असे अभ्यासक मानतात. आजही ही लोकं रत्नागीरी मधील गंभीरगड याठिकाणी भेटीसाठी दर्शनासाठी जात असतात. कोकणी-कोकणा जमाती या महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पसरलेल्या आहेत. त्यात दादरा- नगर-हवेली, सिल्वासा-डहाणू, जव्हार ,मोखाडा, धुळे ,नासिक, नंदुरबार, अहवा डांग, ठाणे या भागांमध्ये बसलेली आहे. वास्तविक पाहता हा समाज जरी कोकणा-कोकणी असला तरी त्यांच्या भाषेमध्ये विविधता दिसून येते. त्यात बुंधाडी, घाटली, डांगी बारी, वारली बारी, खाल्ली अशा बोलीभाषा आहेत. नुसते कोकणा -कोकणी नव्हे य तर संपूर्ण आदिवासी जमाती या निसर्गपूजकच आहेत. कोकणी समाजाचे लोकवाड़मय हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित झालेले आहे. त्यातील काही लोकवाङ्मयाचा अल्पसा परिचय आज विविध पैलुनी करू देण्याचा हा एक छोटा प्रयत्न करत आहे.

सुरुवातीला लग्न गीते पाहुया…

१ )घाण सुचविण्याचे गाणे-

 कई-या मुसळ चिकण

कशी कांडू मी एकली एकली रामा

खांद्यावर घोंगडी फिरी वना नगरी

नही भेटणी सुंदरी सुंदरी रामा

सुंदरी करावी दुसरी दुसरी रामा

2) मांडव सुतविण-

मांडव सुतवती लेकी पारबती

मांडव सुतवती रू

हाय कोण वं व्हती ॥ धृ. ॥

हात म शेल धरी गया शिपाना दारी

हात मं शेल धरी

मांडव सुनवती हाय काण वं व्हती

मांडव सुतवती हाय प्रतिभा व्हती नी

मांडव सुतवती

3 )  लग्नगीत

 डोंगर वरली धरमशीळ

भाऊ निघे बहिणी मुळं

चालव बहिण लग्नाल . 

मी त वनु ल लेवाला ॥ धृ ॥

मी नही येतं भाऊ लग्नाला

ले वं बहिण हंडागुंडा

चालवं बहिण लग्नाला

मी नही लेत हंडागुंडा

मी नही येत लग्नाला

ले व बहिण पोटचिकण्या

चालवं बहिण लग्नाला

बहिण झाली हसी खुशी

मी येते भाऊ लग्नाला

        लग्न सोहळ्याबरोबरच आदिवासी समाजामध्ये विशेषतः कोकणी समाज हा ‘डोंग-या देव’ उत्सव साजरा करीत असतो. ही त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते. नियम-पथ्य ह्या गोष्टी सांभाळून वर्षातून आपापल्या सोयीनुसार हा सण ‘देवाची आळवणी’ म्हणून साजरा केला जातो. साधारणतः कार्तिक पौर्णिमा, मार्गशिष पौर्णिमा या वेळेस साजरा केला जातो. डोंग-या देव म्हणजे फक्त एक डोंगरामध्ये गुफा किंवा कपार असते व त्याची पूजा केली जाते. तिथे कोणतीही मूर्ती नसते .डोंग-या देवाला मूर्ती स्वरूप नाही. डोंग-या देवाचे गीत म्हणत असताना खळीवर फेर धरून नृत्य केले जाते व ते करत असताना देवाचे ‘आळवणीपर गीत’ टाळ्यांच्या नादात म्हणतात. डोंग-या देवाचे गीतांना कोकणी भाषेत ‘वळत्या’ म्हणतात.

 डोंग-यादेव वळत्या

कणस-या गडनी माळला उन्ह्या गाई चाररं

उन्ह्या गाई चाररं

दुध्यानी तळ्यावर उन्ह्या गाई पाज रं।

उन्ह्या गाई पाजरं।

पारंब्या वडखाल उन्ह्या दुध काढरं

उन्ह्या दुध काढ रं ।

शे बाई शेे डुर्रव नी शेे।

शेड बाई शे हुर्र व नी शेड्ड   !

 कोकणा-कोकणी समाजातील लोककथाः-

         कोकणा-कोकणी समाजातील लोककथा या गद्य व पद्य दोन्ही स्वरूपात ऐकायला मिळतात. त्यात सत्य-कथा, भयकथा, मृत्यू कथा, अंधश्रद्धेवर आधारित कथा, जादूच्या कथादेवाच्या लोककथा अशा नानाविध कथा आहेत. शक्यतोवर कोकणी-कोकणा समाज हा मृत्यू विधीच्या वेळेस ‘थाळ गाणं’ असा प्रकार लावतात. म्हणजे काय ? तर ज्यावेळेस एखादी व्यक्ती मृत्यू पावली असेल तेव्हा दहाव्या दिवशी अथवा दहाव्याच्या आदल्या दिवशी वेगवेगळ्या भागानुसार या कथा सांगितल्या जातात. या देवाच्या कथा असतात, हसण्याच्या कथा असतात, दुःखाच्या कथा असतात, वेदनेच्या कथा असतात तर कधी ‘गरूडपुराण’ देखील सांगितले जाते. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे यात गुणगान केले जाते, ‘थाळगाण’ करत असताना एक काशाची थाळी कोतीचा मेण व नदीकाठची सरकंडी याचा वापर करून त्या संगीताच्या नादात कथा गायली जाते/सांगितली जाते. तसेच कथा सांगणा-यांना ‘कथेकरी’ म्हटले जाते. हे तीन किंवा चार व्यक्ती असतात. एक पुढे बोलतो त्याच्यामागे बाकीचे हेल धरतात. लोककथा वाङ्मय कोकणी भाषेमध्ये खूप समृद्ध आहे.

‘कोकणा- कोकणी’ भाषेतील देवांची गाणी:-

         आता वळूया ‘कोकणा-कोकणी’ भाषेतील काही देवांच्या गाण्याकडे. याला ‘वळत्या’ असे म्हणतात. घ-या देव नवरात्रमध्ये बसतात. तेव्हा ढाक्याच्या (एक वाद्य) तालावर वळत्या म्हटली जातात.

 येल येल ना मांडव रं तुना  ।

येल येल ना मांडव

बहिरम देव तु नऊरा जया ।

तुला सोनाना बार्शिग

सोनाना बार्शिंगला मोतीयांना तुर्रा रं  ।

येल येल ना मांडव रंतुना

येल येल ना मांडव ।

मुंजुदेव तु नऊरा जया

तुला सोनाना बार्शिंग ।

सोनाना बार्शिंग ला मोतीयांना तुर्रार ।

येल यल ना मांडव तुना येल येल ना मांडव वं ।

 

       जसे लोकगीत, लोकनृत्य, लोककथा या भाषेमध्ये समृद्ध आहेत तसेच वाक्प्रचार, म्हणी, कोडी देखील या भाषेला एकवेगळी ओळख करून देतात. तर यातील काही कोडी म्हणजेच कोकणी भाषेतील ‘उमान.’ ते सुद्धा आपण पाहुया….

 1) बठा घर फिरीसनी ये आणि उगीच कोपरा मं बशी रहा, उत्तर = शिराव, झाडू

2) एवढा एवढा गडू आणि भुईम दडु, उत्तर = कांदा

3) माना मामा गाव ग्या घरला बोकड्या टांगी ग्या, उत्तर = कुलुप

4) कोरड्या हिरम वाघ गगरे, उत्तर = घरटी

5) मान्या मामा न्या खंडीभर गाई सकाळी उठीनी काही ना.माई, उत्तर = चांदण्या

           या भाषेमध्ये  असंख्य  वाक्प्रचार आहेत. म्हणीपण आहेत. तसेच सण -समारंभामध्ये विविध गीते गायली जातात .त्यात होळीगीते, दिवाळीचीगीते ,पंचमीचीगीते जातात. ‘पंचमी’ हा सण नागपंचमीला साजरा केला जातो .त्यादिवशी भींतीवर सारवून चुन्याच्या रंगाने भीत्तीचित्र काढले जाते. त्यात हा समाज जी दैनंदिन काम करतो, शेती असेल ,जोडव्यवसाय असे त्याची रेखाटन केले जाते. विविध प्राणीही रेखाटले जातात. ही चित्रे काढण्याची पद्धत जवळपास सर्वच आदिवासी समाजात सारखीच आढळून येते.अजून एक सर्वसमावेषक भाषेतील स्वलिखित गीत असे,

आम्ही आदिवासी मूलनिवासी

मूलनिवासी..।

भिवजो नही आम्ही कोणाला

या धरतींना वासी रं  ।

कडी कपारमं

आम्हनां डोंग-या देव रं  ।

डोंग-या देव रं

पुजजं कंसरा माता रं  ।

कंसरा माता रं ॥ धृ ॥

फडकी नी लुगडा वं

आम्हनी खरी वळखं व्हं  ।

खरी वळखं व्हं बया तिला

इसराशिल नको वं ॥धृ॥

मुंजुदेव बहिरम देवना

आम्ही पुजक व्ह्य ज रं

नाग वाघवेव नी आम्ही

पुजा कर जं रं  ।

पुजा करंज रं ॥ धृ ॥

           एकंदरीत कोकणी-कोकणा बोलीभाषा ही कानास ऐकण्यास गोड आहे. फक्त दुःख एकच की, लिखित स्वरूपामध्ये तिचा ठेवा फार कमी प्रमाणात आहे. जर तिचं संवर्धन, जतन केले तर तिच्यात इतिहास सापडू शकतो. आणि भाषा लोप पावण्याची भीती कमी होईल. कारण सुशिक्षित पांढरपेशा नोकरदार शहरी विभागात राहणारा ‘कोकणी समाज’ हा आपल्या बोलीभाषेला कमीपणा समजतो. काही मंडळींना आपली भाषा बोलणं म्हणजे मानसन्मान कमी होणार असे देखील वाटतं, ही वस्तुस्थिती बदलायला हवी. (काही अपवाद आहेत) मात्र या सुशिक्षित लोकांनी आपल्या भाषेचे संवर्धन करायला हवे. जतन करायला हवे. उलट गावातील पाड्यावरची लोक भाषा संवर्धित करून ठेवीत आहेत. परंतु ती मौखिक स्वरूपात. हा फक्त कोकणा-कोकणी भाषेचा प्रश्न नसून सर्वच आदिवासी आणि आदिवासी जमातीतील लोक साहित्याला जनमानसात पोहचविणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकवाङ्ममय संग्रहित, संकलित करून लिपिबद्ध करून, लिखित स्वरूपात असण्याची नितांत गरज आहे. आदिवासींचे साहित्य हे वास्तवातून जन्माला आले आहे. तसेच त्याचा जन्म निसर्गाच्या कुशीत उस्फूर्तपणे ,भावनांच्या भक्तीच्या मुक्तीच्या शक्तीच्या आविष्काराने निर्माण झाला आहे. शेवटी एकच लक्षात येते. ‘आदिवासी लोकसाहित्य हे पूर्णतः एक वेगळे विश्व’ आहे.

 प्रतिभा देशमुख, चौरे

पीएच, डी. शोध विद्यार्थिनी

(झुंझनु विद्यापीठ राजस्थान)

मार्गदर्शक

डॉ. प्रतिभा घाग-सोनी .

श्री. डॉ. नामदेव भिला माळी.

 

(मराठी साहित्य वार्ता या डिजिटल वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखामधील विचार हे संबंधित लेखकांचे असून त्याला संपादक तथा संपादक मंडळ सहमत असलेच असे नाही.)

हे ही वाचा…

सातारी बोली आणि लोकसाहित्य – प्रा. डाॅ. जया जितेंद्र कदम https://marathisahityawarta.in/?p=1167

गोमंतकीय लोकसंस्कृती आणि बोलीभाषा – प्रा. पौर्णिमा केरकर https://marathisahityawarta.in/?p=1159

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close