कथासाहित्य प्रकार

“आमच्या गावचा पाऊस आणि आमचे लॉक डाऊन” – हरीष जाधव वागळूदकर

सुजित कदम, पुणे जिल्हा समन्वयक मराठी साहित्य वार्ता

“आमच्या गावचा पाऊस आणि आमचे लॉक डाऊन” – हरीष जाधव वागळूदकर

खरंतर सगळीकडे एकाच ऋतुत पावसाळा असतो. फक्त कमीजास्त प्रमाणात पडतो एवढच. आमच्या गावचा पाऊस काही वेगळा नाही, परंतु आमचं शिवार, नदी नाले, दऱ्या, खोऱ्या, जंगल सर्वकाही वेगळे वाटले म्हणनच मला म्हणावेसे वाटले ‘आमच्या गावचा पाऊस आणि आमचे ‘लॉकडाऊन.’

साधारण साठ वर्षापूर्वी आमचं गाव छोट खेडं होत. आजही छोटच आहे. फरक एवढाच की गावात रस्ते झाले, एक रेषेत घर झाली, स्वतंत्र शाळा, स्वतंत्र मंदीर झाले. हा सगळा बदल आमच्या गावच्या नदीवरील ओझरखेड धरणामळेच झाला. साठ वर्षापूर्वी आमचं गाव फार वेगळ होत. लहान मोठी पन्नास पंचावन घर. मारूतीच्या मंदीरातच शाळा भरायची. आम्ही मुलं शाळेत आल्यावर प्रथम मारुतीरायाच्या पायाला हात लावूनच वर्गात बसत. गावात आजूबाजूला भरपुर जंगल होतं. गावात मोठमोठी झाड होती. शेवरी, पिंपळ, चिंच नी बोर वगैरे वगैरे, काही कुणी लावली नव्हती नैसर्गिक वाढलेली जंगलातल्या झाडासारखी. मनसोक्त वाढलेली जंगलासारखी. जंगलही गावापासून फार दूर नव्हते. फर्लांगभर अंतरावर आमच्या गावची नदी वहात असे. बाराही महिने पाणी वहात असायचे. पावसाळाच तसा होता तेव्हाचा. नदी ओलांडुन वणीकडे जाताना आडी लागायची.

आडी म्हणजे एक प्रकारचे पठार. त्या पठाराच्या उताराला नी पठारावर भरपूर जंगल होते. एकट्याला वणीला जायला भीती वाटत असे. रस्त्याने कुठे खाड खुड झाली तर पोटात गोळा उठायचा. कुठूनही बिबट्या वगैरे येण्याची भिती असायची. त्यावेळेस सात जुन म्हणजे सात जूनलाच पाऊस सुरु व्हायचा. एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तर झाले. नाही तर सात जून ठरलेलंच. आतासारखा महिना महिना लांबलेला, पावसाची वाट पाहण्यात व्याकूळ झालेला शेतकरी, असं कधी होत नसे. एकदा सुरू झाला की थांबायच नाव घेत नसे. इरले घेऊनच बाहेर पडाव लागत असे. इरल्याला आमच्याकड घोंघड म्हणायची पध्दत होती. पाऊस थांबण्यासाठी वरूण राजाची विनवणी करावी लागत असे. दिवसाआड आमच्या नदीला पूर असायचा, दहा दहा बारा बारा दिवस पाऊस सुरू असायचा. त्याला आम्ही झड लागली म्हणत असू. संततधार पाऊस सुरु असायचा. तेव्हा आमचा ‘लॉक डाऊन’ सुरू व्हायचा, आमची जित्राबही दहा दहा पंधरा पंधरा दिवस गोठ्यातच बांधलेली असायची. चारापाणी गोठ्यातच होत असे. आम्हीही घरातच थांबत असत. चटनी भाकरी खाऊन दिवस काढीत असत. बाहेर पडायची सोय नव्हती.

बाहेर नदीनाले, ओहळ तुडुंब भरून वहायचे. शेतातुनही पाणी वहात असत. लाल मातीच्या, तांबूस रंगाचेच पाणी नदीनाल्यांना असायचे. गावात घराशेजारी कंबरा एवढाले गवत सगळीकडेच दिसत. त्या गवतातच आम्हाला सकाळी सकाळी लोटा घेऊन जावे लागत. सुरुवातीला वीतभर गवत गुरंढोरं चवीन खुर टून खात असत. पण तेच वाढल्यावर त्याला तोंड लावीत नसत. मग ती गुर रान माळा वरचे नाहीतर बांधा वरचे गवत खात असत. आम्ही बांधावरच्या गवताला ‘कुंदा’ म्हणत असत. गावात काही ठिकाणी उताराची जागा सोडली तर सगळीकडे सपाट नी चिखलच चिखल. आमच्या घरासमोर गुढगा भर चिखल गाळ असायचा. एक पाय काढला तर दुसरा रुतून बसायचा. घराशेजारीच वाडे असत. प्रत्येकाच्या वाड्यात हिरवीगार मका दिसत असत, पोपटी रंगाचे टरारलेले कणीस अन वरती तपकिरी तुरे लोंबतांना दिसत. गावात प्रत्येकाचे असे लहान मोठे वाडे असत. कर टू ले, कारले तर न लावताही कुपाटीवर पसरत. दोडके भोपळे गिलक्याचे वेल वाड्याच्या कुंपणार दिसत, पिवळीधमक फूले लगडलेली अन त्यावर मधमाशा नी फुलपाखरे घोंघावत. पिवळ्या रंगाचीच फुलपाखरे वेलावरली फुलेच भासायची. खूप छान दृश्य दिसत असे.

संध्याकाळी गुराखी गायी गुर घेऊन परतायचा तेव्हा ती थरथरतांना दिसत, पाठीवरून पाणीही निथळायचे – सगळा गोठा चिखलाने भरुन जायचा, गुरांना बसायलाही कोरडी जागा नसायची, मग आम्ही त्यांना माडीवरून भूस आणून टाकीत. गायी गुरं तेच भूस खायचे अन त्यावरच लोळायची. प्रत्येकाच्या घराच्या ओट्यावर शेकोटी कायम पेटलेली रहायची. गडीमाणसं शेकोटीसमोर समोरच बसून तंबाखु मळीत नाहीतर चिलीम ओढीत. बाहेर सगळीकडे अंधारच अंधार. घरातील चिमण्या मिनमिनतांना दिसायच्या. पंचायतीचे कंदील पावसाळ्यात बंदच असायचे. म्हणजे दिवसा न रात्री घरातच बसून रहावे लागत.

एकदा काय झालं, भर पावसाचेच दिवस होते. मंगळवारचा दिवस होता. वणीचा बाजार. बाजार असला की घरातील दोन तीन तीन जण बाजारला जात असत. थोडं फार धान्य गहु, तांदळ विकून तेल, मीठ, मिरची घेऊन येत असत. बाया-बापडे बाजार करून झाला तरी साडे पाच सहा शिवाय निघत नसत. बरोबरीनच निघत. डोक्यावर बाजाराचे ओझं घेऊन. कुणी घरीहुन निघतांनाच घोंघड घेतलेलं असत, कुणी जातांना किंवा येतांना रस्त्यानेच सागाच्या पानाच टेंपररी घोघडं करीत नी चालत. डोकचं तेव्हढं कोरड बाकी अंग पाण्याने भिजून जायचे. त्या दिवशीही बाजार करू मंडळी अशीच बजाराहून निघाली. नी निम्या रस्त्यावरच झडीसारखा पाऊस सुरू झाला. बजारकरू मध्ये आमच्या गावचे तसेच दहेगाव, करंजवण गावचेही माणसं होती. मंडळी भिजत भिजत बाजार सांभाळित दिवेलागनीस नदीकाठावर आली. बघतात तर काय नदीला भरमसाठ पुर आलेला. इकडे चिली पिली रडून रडून हैराण. तिकडे बाया बापड्याचे तोंड उत्तरून गेलेले. पाणी उतरायची वाट पहात थांबलेले, पण पूर ओसरायचा नाव घेत नव्हता. मंडळी पावसानं थडीन कुडकुडत होती. बाया “कुणाचं तोंड पाहील म्या आज… कुणाचं तोड पाहीलं. बाई… प्वार रडत असलं असं काही बाही बडबड करीत होत्या.

निम्मी रात्र उलटून गेली, तरी पाण्याला उतार नाही. वरच्या भागाकडे जाऊन काही लोक थांबले तिकडे रुंद पात्र होते. बऱ्याच वेळेस तिकडून जाणं येणं व्हायचं. एक दोघांनी पाण्यात उतरून पाहिलं, पाण्याचा जोर कमी झाला होता. पाणीही कंबराएवढेच होते. मग सगळेच निघाले. एकापाठीमागे एक. एका हातानं धोतर, लूगडी सांभाळत बायाबापडे तिराला लागले, तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. जेवणाची वेळ तर केहांच टळून गेली होती. चिली पिली रडून रडून काही न खाताच झोपी गेली होती.

आताच्या ह्या लॉकडाऊन मध्ये मला पावसाळ्यातील ‘ते’ दिवस आठवतात. तेही आमचे एकप्रकारचे ‘लॉक डाऊन’च होते. दहा दहा बारा बारा दिवस झड असायची. त्यावेळेस घरातच बसुन रहावे लागत असायचे. पण ह्या खडतर लॉक डाऊनपेक्षा पावसाळ्यातील आमचे लॉक डाऊन सुखद होते.

हरीष जाधव वागळूदकर
नासिक रोड

शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

5 Comments

 1. It is so nice,I could literally imagine being in village and experiencing all that is mentioned in the article…. really nice and refreshing…..

 2. फारच सुंदर. अगदी पहिल्या वाक्यापासुन ते शेवटच्या शब्दा पर्यंत कथा पकड सोडत नाही. सुंदर शब्द रचना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close