कथासाप्ताहिक सदरसाहित्य प्रकार

जाणून घ्या हायकू काव्य प्रकाराची नियमावली…

मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी आम्ही "हायकू समजून घेताना..."  हे साप्ताहिक सदर आम्ही दर रविवारी प्रसिद्ध करीत आहोत. ‘‘हायकू’’ काव्य प्रकारातील बारकावे समजून घेता यावे यासाठी आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे. या सदरामधून प्रसिद्ध कवयित्री कविता क्षीरसागर ह्या लेखन करणार असून कविता क्षीरसागर यांचा ‘‘गंधकुपी’’ हा हायकू व अल्पाक्षरी कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. यासह त्यांचा ‘‘जन्म कवितेचा’’ हा काव्य संग्रह आणि ‘‘सांगू का आई?’’ हा बालकविता संग्रह प्रकाशित आहे. विषयाच्या अनुषंगाने आपल्या काही शंका असल्यास मराठी साहित्य वार्ताला अवश्य कळवा अथवा खाली लेखिकेचा संपर्क दिला आहे त्यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा - संपादक

हायकू समजून घेताना…  (साप्ताहिक सदर – भाग २) – कविता क्षीरसागर

हायकू काव्य प्रकाराची नियमावली

हायकू हा मूळ जपानी काव्यप्रकार आहे. परंतु आता जपानच्या सीमारेषा ओलांडून तो पूर्ण विश्वभरात लोकप्रिय झाला आहे. जपानी, चीनी, इंग्रजी, बंगाली, हिंदी, गुजराथी, मराठी आणि अशा अनेक भाषांनी हायकूला आपलेसे केले आहे.

मात्सुओ बाशो ह्या जपानी कवीने १६४४-१६९४ या कालावधीत हायकूला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. त्याचे दोन हजाराहून जास्त शिष्य होते. त्यापैकी सुमारे ३०० शिष्य हायकूमुळे जपानी साहित्यात लोकप्रिय झाले. त्याच्यावर झेन तत्वज्ञानाचा खूप प्रभाव होता. हायकू समजून घेण्यासाठी हे झेन तत्त्वज्ञान जाणून घेणे आवश्यक आहे. या तत्त्वज्ञानामध्ये आत्ताच्या क्षणाला महत्त्व असते. झेन पंथीय आत्ता आणि इथे हे दोन शब्द आपल्या संपूर्ण अस्तित्वाचे निदर्शक म्हणून वापरतात. व्यक्ती जिथे आहे तिथे आणि त्याच क्षणी पूर्ण जागृत व्हायला हवी. मग सर्वत्र भरून राहिलेला परम चैतन्याचा स्त्रोत तिला जाणवतो.

वस्तू जशी आहे तशाच स्वरूपामध्ये तिचा वेध व्यक्तीला घेता आला पाहिजे असे झेन तत्त्वज्ञान सांगते. याखेरीज मनुष्य आणि निसर्ग यांची पूर्ण एकरूपता हा झेन तत्वातील दुसरा महत्त्वाचा विचार आहे. त्यामुळेच निसर्ग, प्रकृती व मानव यांच्यातील एकरुपता हे त्यांच्या हायकूंचे वैशिष्ट्य बनले. (संदर्भ:माझे हायकू-शिरीष पै )

खाली बाशोचे काही हिंदी अनुवादित हायकू उदाहरणार्थ दिले आहेत. (संदर्भ – कविताकोश)

बिजली चमकी
और एक रात की हैरान चीख
अंधकार चीरती चली गई

शरद की हवा
एक खुले दरवाज़े के आरपार
चुभती हुई एक कराह

खरंतर वीज चमकणे, थंडगार हवा येणे… ह्या निसर्गातील नेहमी घडणाऱ्या गोष्टी आपणही पाहतो. पण त्यावरचीच अशी हायकू रचना वाचताना ती संवेदनशील मनाच्या आरपार जाते. स्तब्ध करते.

हायकू समजून घेण्यासाठी ऋतूविषयीची जागरुकता, ममता समजायला हवी. निसर्गावर नितांत प्रेम असायला हवे. तरच ते हायकू मध्ये ध्वनित होऊ शकते. वरकरणी साध्या साध्या दिसणाऱ्या निसर्गचित्राशी सुद्धा माणसाच्या भावभावना सूक्ष्मपणे संलग्न झालेल्या असतात हे समजून घेता आले पाहिजे.

भारतामधे रविंद्रनाथ टागोर यांनी बंगालीमधे हायकू लिहिले व रसिकांना त्याची गोडी लावली असे मानले जाते. तर महाराष्ट्रात शिरीष पै यांनी हायकूची ओळख मराठीला करुन दिली हे आपण जाणतोच. पण त्यांनी हायकूसदृश रचना लिहिल्या. हायकू नव्हे असे माझे मत आहे. मराठी साहित्याला हायकूची ओळख करुन देण्याचे श्रेय निःसंशयपणे त्यांच्याचकडे जाते.

प्रत्येक भाषेची आपापली स्वतंत्र लिपी असते. वर्णमाला असते. त्यामुळे एखादा काव्यप्रकार दुसऱ्या भाषेत, संस्कृतीत रुजताना काही मर्यादा येऊ शकतात. आपण देवनागरी भाषेत लिहितो. देवनागरी ही वैज्ञानिक भाषा आहे. जे लिहिलं जातं तेच वाचलं जातं. त्यामुळे देवनागरी लिपी हायकू लिहिण्यासाठी उपयोगी आहे.

५ ७ ५ अशा फक्त १७ अक्षरसंख्येमध्ये लिहिला जाणारा हा लघुत्तम प्रभावी काव्यप्रकार आहे. आकाराने लहान असणे हायकू चा गुणही आहे आणि त्याची मर्यादा आहे त्यामुळेच यामध्ये एक अक्षरसुद्धा व्यर्थ चालत नाही.

हायकूचे सर्वसाधारण नियम..

१. ५ ७ ५ = १७ अक्षरांच्या तीन ओळी. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये पाच अक्षरे दुसऱ्या ओळीमध्ये सात अक्षरे व तिसऱ्या ओळीमध्ये पुन्हा पाच अक्षरे अशी एकूण १७ अक्षरांची ही छोटी काव्यरचना असते.

२. हायकू रचनेमध्ये दोन ओळींमधे यमक साधणे अपेक्षित असते. पहिल्या व तिसऱ्या किंवा दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत यमक असावे. (काहीजण या नियमाचे पालन करत नाहीत. पण माझ्यामते पालन केले पाहिजे. )

३. पहिल्या दोन ओळीत प्रस्तावना व तिसऱ्या ओळीत त्याला कलाटणी असते.

४. तिनही ओळी मिळून एक वाक्य बनणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.
हायकू म्हणजे ५ ७ ५ अक्षरांमधे तोडलेले वाक्य नव्हे हे लक्षात ठेवायला हवे.

५. शक्यतो निसर्ग व मानवी भावना हा विषय असतो.(पूर्वी निसर्ग व अध्यात्म हा हायकूचा मुख्यतः विषय होता. आता हायकूने त्याबरोबरच अनेक विषयांना कवेत घेतले आहे. )

६. हायकू सहज उद्गारासारखा उत्स्फुर्त हवा.

७. हायकूची भाषा अनलंकृत हवी. बोलीभाषेचा वापर हवा.

हायकू लिहिण्यासाठी वरील नियमांचे पालन केले तरच ते हायकू ठरतील.
अगदी छोटा काव्यप्रकार आहे, सोपा वाटतो म्हणून तो कसाही लिहिला तर त्याला अर्थ नाही. सध्या फेसबुकवर असे अनेकजण हायकू लिहिताना दिसतात. ते पाहून वाईट वाटते. लिहिण्याआधी किमान त्या काव्यप्रकाराचे नियम समजून घेणे आवश्यक आहे. हा लेख वाचून एकाला जरी हायकू लिहिण्याची स्फुर्ती झाली तरी हा लेख लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटेल.

या भागामधे आपण हायकू चा थोडा इतिहास व त्याचे नियम जाणून घेतले. पुढील भागात हायकूची काही उदाहरणे पाहू. तसेच तीन ओळींचेच त्रिवेणी, हायकूसदृश रचना, माहिया ह्या काव्यप्रकारांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

कविता क्षीरसागर
पुणे
संपर्क – ९४०३१८५९२२
शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

4 Comments

 1. आदरणीय कविताताई..
  हायकू च्या संदर्भातील आपले विवेचन खूपच मार्गदर्शक व उपयोगी आहे.
  हायकू मध्ये सामावलेली प्रचंड ताकद वापरता येण्यासाठी निसर्गाशी एकरूप होऊन त्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
  आपल्या या लेखामुळे हायकू लिहिणाऱ्या नवोदित कवींना खूपच प्रेरणा मिळेल.

 2. आदरणीय कविता मॅडम,
  सविनय नमस्कार????

  मी आज आपला *मराठी साहित्य वार्ता* मधिल हायकू विषयक लेख आणि त्यातील हायकू नियम वाचले. हायकू नियम क्र.२ (कोणत्याही दोन ओळीत यमक असावे) अत्यंत चुकीचा आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
  कारण हायकूतील तीन ओळींचे दोन भागात विभाजन केल्यास ते याप्रमाणे होईल,

  पहिली + (दुसरी-तिसरी)
  (५+१२)

  किंवा

  (पहिली-दुसरी) + तिसरी
  (१२+५)

  *प्रत्येक भागाच्या शेवटी यमक असायला हवे.*

  ह्याचाच अर्थ,

  *पहिल्या* व *तिसऱ्या* (५+१२)

  किंवा

  *दुसऱ्या* व *तिसऱ्या* (१२+५)

  *ओळीतच यमक असायला हवे!*

  तेव्हा पहिल्या व दुसऱ्या ओळीत यमक चालणार नाही!! म्हणून आपण नियम २ कोणत्या आधारावर मांडला आहे त्याचा संदर्भ दिल्यास बरे होईल.

  धन्यवाद????

  1. प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपण व्यक्त केलेली शंका ही नजरचूकीने टाईप करतांना झाली होती. त्यासंदर्भातील बदल आपण लक्षात आणून दिल्यानंतर तातडीने करण्यात आला आहे. झालेल्या नजरचूकीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. – संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close