लोकसंवाद

धनगरी बोली आणि लोकवाङ्मय – प्रा. डॉ. दत्तात्रय कारंडे (पुणे)

लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत

        भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात विविध जात, धर्माची, पंथांची, संप्रदायाची माणसं गुण्यागोविंदाने नांदत आहेत. अशा या आपल्या बहुभाषिक देशामध्ये विविध बोली बोलल्या जातात .भाषा दर बारा कोसावर बदलते असे म्हटले जाते. ते अगदी खरे आहे. महाराष्ट्राची भौगोलिकता विचारात घेतली तर व-हाडी, अहिराणी, मराठवाडी, डांगी, मालवणी, सातारी यासारख्या अनेक बोलीभाषा आढळून येतात. भौगोलिक स्तरावर जसा भाषाभेद आढळून येतो तसाच तो सामाजिक स्तरावरही दिसून येतो. विविध जातसमूहाच्या बोलीभाषा वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ धनगरी, ठाकरी, भिल्ली, महादेव कोळी, पारधी, ठाकरी, पावरा अशा कितीतरी बोलीभाषा महाराष्ट्राच्या भाषेत भर घालणा-या आहेत. परंतु भाषेतील बोलीभाषांचा अभ्यास दुर्लक्षित राहिला आहे. खरंतर बोलीभाषा जिवंत राहिल्या तरच प्रमाणभाषा टिकणार आहेत.

भीमथडी परिसरातील धनगरी बोलीचा परिचय करून देत असताना ही बोली ज्या भागात बोलली जाते त्या परिसराची ओळख करून देणे महत्त्वाचे वाटते. पुणे जिल्ह्याच्या पूर्वभागातील बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, पुरंदर या परिसरातून भीमानदी आणि तिच्या उपनद्यांची खोरी असल्याने या परिसराला ‘भीमथडी’ या नावाने ओळखले जाते. या परिसरात शेळी, मेंढी पालनासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे या भागातील धनगर लोक मोठ्या प्रमाणात शेळी, मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. भीमथडी परिसरात धनगर लोकांचे वास्तव्य प्राचीन काळापासून असल्याचे डी. डी. कोसंबी, डॉ. गुन्थर सोन्थायमर, डॉ. रा. चि. ढेरे यांनी आपल्या संशोधनातून सिध्द केले आहे. भीमथडी परिसरातील धनगरी बोलीभाषेतून अविष्कृत झालेले मौखिक वाङमय जितक्या विपूल प्रमाणात भीमथडी परिसरात आढळते तितक्या विपूल प्रमाणात ते महाराष्ट्राच्या इतर भागात आढळत नाही. त्याचे महत्त्वाचे कारण या भागात धनगरी देवतांची मुख्यठाणी आहेत. या धनगरी देवतांच्या मुख्यठाणांच्या ठिकाणी त्यांच्या नित्योपासना आणि विधीउत्सवाच्या निमित्ताने देवताविषयक लोकगीते, वाणगीते, उपासनाविषयक लोकगीते, सुंबरान यांचे गायन केले जाते. या माध्यमातून धनगरी बोलीभाषेतून अविष्कृत झालेल्या मौखिक वाङमयाचे आणि त्यातून व्यक्त होणा-या संस्कृतीचे संक्रमण एका पिढीपासून दुस-या पिढीपर्यंत झालेले आहे. तसेच ते अनुकरणातून महाराष्ट्रातील इतर भागातील धनगर समाजातही झालेले आहे. भीमथडी परिसरात धनगर लोकसमुदायात पारंपरिक जीवन जगणा-या लोकांची संख्या आजही मोठी आहे. हा लोकसमुदाय मुख्य प्रवाहापासून अलग असलेला, पारंपरिक व्यवसाय करणारा, स्वतःची भाषा, संस्कृती जपणारा लोकसमुदाय आहे. त्यामुळेच या लोकसमुदायात त्याची बोलीभाषा अजूनही टिकून आहे.

सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो ती म्हणजे धनगर समाज हा संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात विखुरलेला आहे. भीमथडी परिसरातील धनगर लोकसमुदायची जी बोलीभाषा आहेत ती आणि महाराष्ट्राच्या इतर भागात असणा-या धनगर लोकांची जी बोलीभाषा आहे यामध्ये फरक आहे. कारण त्या त्या प्रादेशिक बोलींचा तिथे राहणा-या जातसमूहाच्या बोलीभाषेवर प्रभाव असतो. मी जे सांगणार आहे ते भीमथडी परिसरातील धनगरी बोलीविषयी सांगणार आहे. ती बोलीभाषा संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाची नाहीतर ती भीमथडी परिसरातील धनगर लोकांची बोलीभाषा आहे.

धनगरी बोलीभाषा परिचय आणि वैशिष्ट्ये:- भीमथडी परिसरातील धनगरी बोली ही मराठी भाषेचीच एक बोलीभाषा आहे. ही बोलीभाषा प्रामुख्याने दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर, पुरंदर या तालुक्यातील धनगर लोकसमुदायात बोलली जाते. धनगरी बोली ही प्रामुख्याने कुटुंबात आणि स्वसमाजातच बोलली जाते. तिला स्वतंत्र लिपी नाही मात्र त्यामुळे तिच्या सांस्कृतिक अस्मितेला कोठेच बाधा येत नाही. धनगरी बोली ही मौखिक स्वरूपात असल्यामुळे तिच्या उच्चारात वेगवेगळ्या कारणांनी काही प्रमाणात बदल होतो. ही बोली बोलणारे धनगर लोक शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमागे भटकंती करत असल्यामुळे सतत मोकळ्या हवेत फिरतात त्यामुळे त्यांचा आवाज खणखणीत असतो .बोलण्यात काहीसा मुक्तपणा , स्वैरपणा, विशिष्ट हेल व लकबी दिसून येतात.
धनगरी बोलीचे स्वरूप समजावून घेण्यासाठी दोन ओळीचा संवाद पुढीलप्रमाणे रूसकाळची वेळ आहे .धनगर जोडप्यातला हा संवाद आहे.
नवरा :- पारे ! ऐ पारे ! मी थांबायचं बघून येतो. तू तेवढं हुडकून घे.
पारु :- (कंबरेवर हात ठेवून, नाकातील नथ उडवत) हो हो मस झाली बोलायची आकड. सकाळी बास्त्याला गेल्यावं बघा थांबायचं.
याचा मराठीत अर्थ पुढीलप्रमाणे:-
नवरा :- पारु मी जनावरांना चारण्यासाठी चराऊ रान शोधतो तू तेवढं मेंढराचं दूध काढून घे.
पारु :- वारेवा काय तुमची बोलायची मिजास. सकाळी शेत खतावणीच्या बदल्यात मिळणारा मोबदला आणायला गेल्यावर चराऊ रान देखील शोधा.
आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मराठीत रुढार्थाने हुडकणे या शब्दाचा अर्थ शोधणे असा होतो. धनगरी बोलीभाषेत हुडकणे या शब्दाचा अर्थ शेळ्या, मेंढ्यांचे दूध काढणे असा आहे. थांबायचं या शब्दाचा रुढार्थाने विचार केला तर त्याचा अर्थ थांबणे असा होतो. धनगरी बोलीत या शब्दाचा अर्थ चराऊ रान असा होतो. बास्त्याला हा शब्द खास धनगरी बोलीतला असून त्याचा अर्थ मेंढर शेतात बसविल्यावर खतावणीच्या बदल्यात मिळणारा मोबदला. अशाप्रकारे या बोलीला अथवा तिच्यातील शब्दांना सामाजिक, व्यवसायिक जीवनाचे संदर्भ लाभलेले आहेत.

धनगरी बोलीचा भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता
१) धनगरी बोलीची ध्वनी व्यवस्था प्रमाण मराठी सारखी असली तरी उच्चारण मात्र बरेचसे मुक्त आणि स्वैर स्वरुपाचे दिसते.
२)धनगरी बोलीत क ऐवजी ख, भ ऐवजी म, ध ऐवजी द इत्यादी प्रक्रिया आढळतात.
३) धनगरी बोलीत ज्या प्रमाणे आगामाच्या प्रक्रिया आढळतात त्याचप्रमाणे विविध स्वनलोपाच्या प्रक्रिया आढळतात उदाहरणार्थ पुरुषभर -परसभर
४)धनगरी बोलीतील सर्वनामे प्रमाण मराठीतील सर्वनामांपेक्षा वेगळी आहेत. उदाहरणार्थ हा – ह्या,े तो – त्यो
५) धनगरी बोलीतील विशेषणांची संख्या विपूल असून ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
६)धनगरी बोलीचा विचार करता या बोलीत प्राकृत शब्दांची अधिक भेसळ झालेली दिसते. या बोलीत इंग्रजी, हिंदी, कानडी, पोर्तुगीज, व इतर भाषेतील शब्द असलेतरी त्यांची संख्या कमी असून त्यांचे उच्चार बदलेले आहेत. भीमथडी परिसरातील धनगरी बोलीवर सातारी , पुणेरी ग्रामीण, सोलापुरी, नगरी या प्रादेशिक बोलीभाषांचा काही प्रमाणात प्रभाव जाणवतो.
७)भीमथडी परिसरातील धनगरी बोलीभाषेचा शब्दसंग्रह अतिशय व्यापक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.
८)धनगर लोक कधी कधी बोलताना सांकेतिक भाषेत बोलतात त्याचा हेतु आपला व्यवहार आपल्या माणसापुरता राहावा तो इतरांना समजू नये असा असतो.

भीमथडी परिसरातील धनगरी लोकसाहित्य आणि धनगरी बोली:-
लोकसाहित्याचा अभ्यास हा वाङमयीन, सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीने करण्याची एक परंपरा आहे. लोकसाहित्याच्या वरील पैलूंबरोबर लोकवाङमयाची भाषा हा ही महत्त्वाचा पैलू आहे. यानंतर आपण भीमथडी परिसरातील धनगरी मौखिक वाङमय धनगरी बोलीभाषेतून कसे अविष्कृत झाले आहे ते पाहू या.
धनगरी लोकगीते :- भीमथडी परिसरातील धनगर लोकसमुदायात लोकगीते विपूल प्रमाणात आढळून येतात. आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने त्यात विविधता आढळते. या परिसरातील धनगर लोकसमुदायात एकूण २१ लोकगीत प्रकार आढळून येतात. ज्या दिवशी मेंढरांची लोकर कापली जाते त्या दिवसाला धनगर लोक कातरणीचा दिवस म्हणतात. कातरणीच्या दिवशी धनगर पुरुष मेंढ्यांची लोकर कापण्याचे काम करतात. यावेळी धनगर स्त्रिया कातरकरांच्या जेवणासाठी स्वयंपाक बनविताना गाणी म्हणतात.
‘कातरल्या ग मिंढ्या करती आठाणं बोटव्याचं
बाळाईचं ग माझ्या खांड सुटलं नटव्याचं.’
या लोकगीतात बोटव्याचं हा शब्द आला आहे. बोटव्याचं म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक. हा खास धनगरी बोलीतला शब्द आहे. आठाणं म्हणजे रुपयाची निम्मा भाग, पन्नास पैसे. जेव्हा कधी काळी या लोकगीताची निर्मिती झाली असेल अथवा लोकगायिकेने ते गायिले असेल त्या काळाला ते सुसंगत असेल. सांगायचा मतितार्थ एवढाच की बोलीभाषेतील शब्दाचे अर्थ नीट समजावून घेतल्याशिवाय त्या बोलीभाषेतून अविष्कृत झालेल्या मौखिक वाङमयाचा अथवा लिखित साहित्याचा आपल्याला आस्वाद घेता येत नाही.
सुंबरान:-
धनगरी मौखिक वाङमयात धनगरी ओवी अर्थात सुंबरान हा खास धनगरी लोककला व लोकवाङमय प्रकार आहे. सुंबरान म्हणजे उपकार्त्या निसर्गशक्ती व देवदेवतांचे स्मरण. ढोल, झांज, पवा, घुमक, या वाद्यांच्या साथीने धनगरी ओवी विशिष्ट ढंगात गायिली जाते. गाणं , नाचणं आणि वाजवणं या तिन्ही कलांचा सुमेळ सुंबरानमधून दिसतो.
‘ह्ये…. सुंबरान मांडलं
देवा नाव घेतलं
सुंबरान कुणाला
धरतरी मातला
पडल्या ह्यात मेघाला
अन् चांद सुर्व्या दोघाला
कैलासाच्या सांबाला
मायावाच्या बंधुला
सुरवंतीच्या बाळाला’
धनगरी लोकसंस्कृती ही निसर्गसन्मुख आहे. निसर्गातील ज्या शक्तींनी आपल्यावर उपकार केले आहेत त्या शक्तींचे धनगरी ओवीच्या सुरुवातीलाच असे स्मरण केले जाते. या ओवीत धरती – धरतरी, चंद्र – चांद, सूर्य – सु-याला असे बोलीभाषेतील उच्चारण बरेचसे स्वैर आणि मुक्त स्वरूपाचे झालेले आहे. बिरोबा आणि त्याची आई सुरवंता यांची दिव्यकथा या धनगरी ओवीत सांगितली आहे.
धनगरी लोककथा:- धनगर लोकसमुदायात धनगरी लोककथांना महत्त्वाचे स्थान आहे. रंजन आणि प्रबोधन या प्रयोजनासाठी त्या निर्माण झाल्या आहेत. गाय, शेळी, मेंढी या प्राण्यांना वरचे दात नाहीत या संदर्भातील एक स्पष्टीकरण कथा धनगरी मौखिक परंपरेत आढळते ती पुढीलप्रमाणे –
‘वरचे दात’
फार वरसापूर्वी देवराज्यामंदी. बिरूबा अन् त्याची बायकू कामाबाई गरतीन दोघंच आपली मेंढर वळीत व्हती. जिनगानीला उताटी आल्याली. आता त्यो देवच गडी. गायागुज्याचं वाडं, शेळ्या-मिंढ्यांचं वाडं. झाडास कान लागाना, दगडास खुर लागाना. धन ईष्टक भरप्येट. पर मिंढ्या वळायला धनगोर नव्हताना. तवर महादेवानी त्याला तयार केला नव्हता. देव दिवसभर गाया-गुज्याला, शेळ्या मिंढ्याला वळायचा अन् सांच्यापारी आपला जेवाय बसला की त्यातलं येखादं तरी जनवारं जाऊन चरायला लागायचं. येक दिसी बिरदेवाची मंडळी कामाबाई गरतीन काय म्हंगाली, ‘देवा ! एवढी चारणी करता पन लक्षिमी काय थांबायचं नाव घेत नाय.मंग देवानी काय केलं ?’ दुस-या दिसी मिंढ्या हाकाटल्या अन् दिसभर बारा गावचा शिवार चारून आणला. अन् लावली. गया लावल्या गयाच्या वाड्यात मिंढ्या लावल्या मिंढ्यांच्या वाड्यात . मंग म्हणला ,‘येऊ दे भोज्यान. आज कशी चरायला जात्यात ती बघू?’ देव असा भोज्यान करायला बसला. अन् तेवढ्यात याक शेपाट वाघरीतून निघालं. येक मिंढी बी आली अन् येक गयी बी आली. अन् गेल्या चरायला. तेवढ्यात कामाबाई गरतीन काय म्हणतीया, ‘देवा बघा तुमची करणी.’ कसलीबी बाय असू द्या गडी जेवाय बसला की कायतरी खुसपाट काढतीच. तसाच बबा खरखट्या हातानी उठला. पायात जोडा नाय. काय नाय तसाच गेला. त्याची पक्की तळपायाची आग मस्तकाला गेल्याली. पक्की तिडीक उठल्याली.बाई माणसाचं बोलणं ऐकाय लावताय व्हयं. मंग रागा रागानी त्यानी म्हणतो अशी लाथ मारली. त्ये सगळं वरचं दातच पाडून टाकलं. तवापासून बघा गयीला शेळीला मिंढीला वरचं दात नाहीती. ही देवाचीच करणी. करून ठिवलीया बिरदेवानी करणी.
धनगरी लोककथेची भाषा बोलीभाषा असल्याने या भाषेत जिवंतपणा जाणवतो. या लोककथेतील ब-याच शब्दांना सामाजिक, कौटुंबिक, व्यवसायिक संदर्भ लाभलेले आहेत. ती साधी, घरगुती आहे. तिच्यात जिव्हाळा आहे. कणखरपणा आहे. ती कधी रांगडी , ओबडधोबड दिसेल पण अंतरूकरणाने प्रमेळ आहे.
धनगरी वाण:-
भीमथडी परिसरात धनगर लोकसमुदायात देवताविषयक वाण व लोकवस्तीचा वाण असे वाणाचे दोन प्रकार आढळून येतात. देवताविषयक वाण शाहिरी ढंगात व आवेशपूर्ण स्वरात गायिला जातो. देवताविषयक वाणाची भाषा गद्य -पद्य मिश्रित चुर्णिकेसारखी असते. देवताविषयक वाण हे प्रामुख्याने पुराणकथा व दैवतकथांवर आधारित असतात . देवताविषयक वाणगीतांना धनगरांच्या धार्मिक जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवताविषयक वाणांची भाषा समजण्यास अवघड वाटत असली तरी ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. देवताविषयक वाण पुढीलप्रमाणे असतो.
‘शिव हर हर भोळ्या देवा
करीन करीन तुझी सेवा
करशील तरी कवा ?
सत्य यवगामधी
पावन देव राज्यामधी
कोण याळ कशी ?
कोण घटका कशी ?
करुन आरती आली भोळ्याच्या लग्नाशी
करून कंगण लागतंय त्याशी.’
महादेव -पार्वतीच्या लग्नासाठी मेंढीच्या लोकरीचे काकण लागत होते. ते शोधून काढण्याची जबाबदारी सर्व देव बिरोबावर सोपवितात. बिरोबाला काकण बनविण्यासाठी मेंढी लोकर देते. त्या बदल्यात बिरोबा मेंढीची राखण करण्याची जबाबदारी गणगावड्यावर (धनगरांवर) सोपवित असल्याचे तिला वचन देतो अशा आशयाचे वर्णन या वाणात आहे. लोकवस्तीचा वाण हा वाणगीताचा दुसरा प्रकार आहे. यालाच श्व्होरा श् असेही म्हणतात. लोकवस्तीचा वाण हा धनगर लोकवस्तीवर आधारित असतो.
म्हणी, वाक्प्रचार, उखाणे:-
भीमथडी परिसरातील लोकगीत, लोककथाप्रमाणे म्हणी, उखाणे यांचे दालनही समृध्द आहे. ‘आधी गुतू नये मग कुथू नये’, ‘रीन काढून सण करू नये’, ‘दिल्या भाकरीचा आणि सांगितल्या कामाचा’, ‘आपल्या ढुंगणाखाली जळतंय अन् दुस-याचं इझवायला पळतंय’ ‘देवाची करणी अन् नारळात पाणी’, ‘हुरळली मिंढी गेली लांडग्याच्या पाठी’ ‘धनगाराचं याड सव्वापार जात नाय’ यासारख्या धनगरी मौखिक परंपरेतील अनेक म्हणीतून व्यवहारज्ञान, जातिव्यवस्था, श्रध्दाभाव, मानवी स्वभाव यांचे दर्शन घडते. भीमथडी परिसरातील धनगर समाजात प्रचलित असलेली कोडी ही त्यांच्या जीवनाभुवाशी निगडित असल्याचे दिसून येते.
‘आधी होती साधी भोळी
मंग आली रंगाला
हात लावू देईना अंगाला.’ (करड ईचे झाड)
निसर्गाचा कायम सहवास लाभलेल्या धनगर माणसांमध्ये निसर्गातील प्रत्येक गोष्ट मानवी स्वभावातून निरखून पाहण्याची प्रवृत्ती आहे. तिचे दर्शन वरील उखाण्यातून घडते.
भीमथडी परिसरातील धनगरी मौखिक परंपरेत प्रचलित असलेले नाव घेण्याचे उखाणे वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पना वैभवाने नटलेले आहेत. हे उखाणे अत्यंत कलात्मक , तालबद्ध , व लयबध्द असे आहेत. ‘आंगरकाठी डोंगरकाठी भांडगाव माझं गाव अन् झिणकार्यानं कुकू लेती…… तिचं नाव.’ काळी घोंगडी चट्टयापट्टयाची…… माझी येका रट्टयाची’, या उखाण्यातून धनगर पुरुषाच्या अंगी असलेला रांगडेपणा व्यक्त होतो. मात्र यात आतून प्रीतिभाव दडलेला असतो हे वेगळे सांगायला नको. नाव घेण्याच्या उखाण्याप्रमाणे रुखवताचे उखाणेही धनगरी मौखिक परंपरेत आढळतात. आटोपशीर रचना, ठसकेबाजपणा आणि लय हे विशेष या उखाण्यात दिसतात. ‘आला आला रुखवत. रुखवतावर व्हतं धनं. नवरीच्या कल्हवरीच्या बेंबटावर बेंडकुळ कण्हं. कण्हं तं कण्हं भज्यानं पण म्हणं’ या उखाण्यात थट्टा, विनोद आणि थोडासा अश्लिल भाग असलातरी आप्तस्वकीयांच्या मधला हा संवाद असतो म्हणून खेळकरपणाने तो स्विकारला जातो.
देवतांची विनवणी गीते:-
भीमथडी परिसरातील धनगर लोक भगताच्या अंगात देवतेचा संचार आणण्यासाठी देवतांची विनवणीपर गीते म्हणतात. या गाण्यांना देव आणण्याची ओवी असेही म्हटले जाते. या लोकगीतात देवतचे रुप -गुण वर्णन करून देवतेस आपले प्रश्न सोडविण्यासाठी अवाहन केलेले असते. विनवणीपर गीते म्हणण्याचा अधिकार फक्त भगत , मानकरी व जाणकारांना असतो. देवताविषयक विनवणीपर गीत पुढीलप्रमाणे असते.
‘परतं परतं र माघारा
परतंय परतंय परतंय
हा देव भाकचा कानवाळा
पुत्र कोण्यावं राजाचा
हा देव भोळ्याच्या थापचा
हा देव भोळ्याच्या तपाचा’
हे देवा, तू लवकर माघारी ये .तू तुझ्या भोळ्या भक्ताच्या हाकेला ओ देणारा दयाळू देव आहेस. तेव्हा तुझ्या भक्तावर आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तू लवकर निघून ये असे अवाहन वरील गीतात करण्यात आले आहे.प्रत्येक देवतेचे विनवणीपर गीत स्वतंत्र असते. ज्या देवतेचा भगताच्या अंगात संचार आणावयाचा असतो त्या देवतेचे विनवणीपर गीत यावेळी गायिले जाते.

भाकणूक:- धनगरी देवतांच्या जत्रांमध्ये भाकणूक सांगितली जाते. या जत्रांमध्ये देवतेचा अंगात संचार झालेला भगत वर्षभराचे भविष्यकथन करतो.हे भविष्यकथन आगामी वर्षभरासाठी असल्याने उपस्थित जनसमुदाय ते कान देऊन ऐकतो. भाकणुकीत पीक, पाणी, पाऊस, पाळीव जनावरे, माणसे, पाप-पुण्य, राजसत्ता, रोगराई, नैसर्गिक संकटे यांच्या संदर्भातील भाकिते वर्तविली जातात. भगत भाकणूक सांगताना परंपरेने चालत आलेल्या भाषेत आणि शब्दरचनेत भविष्यकथन कथन करतो. भाकणुकीचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.
‘साहा रे
रोहिणी मिरीग
तीन कोप-याव व्हतील
एका कोप-याव आलं आलं
गेलं गेलं हाय र बाळा व्हं
साहा रे
आडदाराचं पाणी
चार कोप-यावं व्ह ईलं
जनतंची सांगता व्ह ईल र बाळा व्हं
साहा रे
आसाळ मघा
दुपारच्या पाव्हुण्या राहात्याल रं बाळा व्हं.’
अशा प्रकारे या भाकणुकीत नक्षत्रानुसार पाऊस-पाण्याचे भाकीत वर्तविले आहे. भाकणुकीचे कथन लयदार ढंगात, अतिशय आकर्षक व प्रभावी असते. भाकणुकीची रचना, भाषा, शब्दयोजना, कथन पध्दती ठरीव व सारखीच असते स्थलपरत्वे आणि व्यक्तीपरत्वे त्यातील चरण आणि शब्दयोजना यात थोडे-फार पर्याय संभवतात. अशाप्रकारे धनगरी बोलीभाषेतून अविष्कृत झालेल्या धनगरी मौखिक वाङमयातून आपल्याला धनगर लोकसमुदायाच्या पारंपरिक लोकजीवनाचे, त्यांच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. धनगरी बोलीभाषेत अनेक शब्दाची प्राचीन रुप आढळतात. ती वरुन रांगडी ओबडधोबड दिसेल पण अंतरूकरणाने प्रमेळ आहे. तिच्या अंगी मूळचा गोडवा आहे. तिची एक ढब आणि वैशिष्ट्यपूर्ण लकब आहे.
ग. दि.माडगूळकर धनगरी मौखिक वाङमयाचे आणि धनगरी बोलीचे महत्त्व विशद करताना एक ठिकाणी म्हणतात, धनगरांची कला ही अनगड हिर्यासारखी आहे, त्याला पैलू नसतील पण हिरे आहेत. ते उकिरड्यावर पडण्यासाठी नाहीत. मयुर सिंहासनावर चमकण्यासाठी आहेत. धनगर अडाणी असेल, पण त्याला अक्षरातील नादब्रह्माची ओळख आहे. म्हणून हे काव्य माळरानावर जसे आहे, तसेच ते बिर्ला मातोश्री सभागृहातही गेले पाहिजे महाराष्ट्र शारदेच्या व्यासपीठावर सुद्धा याला मानाचे पान मिळायला पाहिजे .‘गदिमांनी कित्येक वर्षांपूर्वी केलेल्या अपेक्षेची पुर्तता मराठी साहित्य वार्ता फेसबुक वेब पोर्टलने पूर्ण केली आहे.’ महाराष्ट्र शारदेच्या व्यासपीठावर आज धनगरी मौखिक वाङमयाला मानाचे पान मिळाले आहे. हा धनगरी मौखिक वाङमयाचा, धनगरी बोलीचा आणि अभ्यासक म्हणून मी माझा गौरव समजतो. याबद्दल मराठी साहित्य वार्ता फेसबुक पेज आणि वेब पोर्टलचे मनापासून धन्यवाद.

प्रा.डॉ. दत्तात्रय कारंडे                   न्हावरे ता.शिरूर, जि. पुणे मो. नं. 9420173232

मराठी साहित्य वार्ता या वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेल्या लेखामध्ये लेखकाने आपले विचार मांडले आहे. त्या मताशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असलेच असे नाही

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close