बातमीपत्रसाहित्य प्रकार

नाती (कथा) – आरुशी दाते

सुजित कदम, पुणे जिल्हा प्रतिनिधी, मराठी साहित्य वार्ता

माझी दुपारची झोप हमखास मोडणारा कोण असेल तर पोस्टमन. नाव पत्ता वाचून त्या घरात पत्र टाकणं एवढंच त्याचं काम. पण तो जाताना हमखास बेल वाजवणार आणि माझी झोपमोड करणार. मनात असो वा नसो तरीसुद्धा उठून मी टपाल घेतलं. त्यातील एकावर माझं नाव बघून उत्सुकतेपोटी बघितलं. साधं पोस्टकार्ड होतं. पण ज्याच्यासाठी ते पत्र लिहिलं होतं, ती व्यक्ती मी नव्हते. चूक की बरोबर हा विचार न करता नकळतच मी ते पत्र वाचलं.
नक्की काय लिहिलं आहे ह्याचा उलगडा झाला नाही, म्हणून पुन्हा वाचले. थोडंसं कळतंय असं वाटलं, पण झोपमोड झालेली असल्याने, थोडी अजून झोपेत असल्याने काहीच बोध होत नव्हता आणि त्यात भर म्हणून मी मला न आलेलं पत्र वाचलं ह्याबद्दल अपराधी वाटू लागलं. एक तर ज्या संस्थेचं नाव होतं, ती संस्था किंवा त्या संस्थेतील कोणाशी बोलल्याचं मला आठवत नव्हतं. म्हणून tv च्या बाजूला टीपॉय होता त्यावर ठेवून दिलं आणि एक डुलकी घ्यायला गेले. जेमतेम दहा मिनिटांची डुलकी झाल्यावर एकदम घाबरून जाग आली. खूप घाम फुटला होता. जणू कोणीतरी जोरजोरात हाका मारतंय, मला वाचवा, मला वाचवा. पाच मिनिटं तशी बसून राहिले, मग उठून स्वयंपाकघरात गेले आणि ग्लासभर थंडगार पाणी प्यायले. तरी अजून अस्वस्थ वाटतंच होतं. बाहेर आले आणि सरळ tv लावला. हो ना, अगदीच एकटं वाटायला नको म्हणून हा पर्याय. तेवढ्यात निकिताचा फोन आला.

“काकू, आजीला घेऊन आम्ही साधारण सहा-साडे सहापर्यंत येत आहोत”. “हो ठीक आहे, या. तुझ्यासाठी ताजा ताजा ढोकळा करून ठेवते गं”. “येस काकू, भरपूर करून ठेव, मी डब्यात घालून घरीपण नेणार आहे. चल, बाय, भेटू या घरी”.
अत्यंत लाघवी पोर. तिचं हे हक्काचं बोलणं मन सुखावून जातं. जणू माझ्याच पोटी जन्माला आली आहे असं एखाद्या तिऱ्हाईताला वाटेल. अर्थात लहानपणापासून माझ्याजवळच होती. कुमुद, तिची आई म्हणजे माझी जाऊ नोकरी करायची. ती नोकरीला गेली की आम्ही दोघी काकू आणि पुतणी धमाल करायचो घरी. तेव्हा एकत्र राहत होतो.
निकिता जस जशी मोठी होऊ लागली तशी तिला privacy हवी म्हणून माझ्या दिरांनी आणि कुमुदने वेगळा फ्लॅट घ्यायचं ठरवलं, आणि मग 1973 पासून ते वेगळे राह्यला लागले. तरी निकिता जवळजवळ साडेसात वर्षांची होईपर्यंत आम्ही एकत्र राहीलो. वेगळं होताना सगळ्यांनाच त्रास झाला, पण मला जास्त झाला. निकिता सोबत होती तोपर्यंत मला मूल नाहीये हे फारसं जाणवलं नाही, आणि कुमुदने ते कधी जाणवू दिलं नाही, हा तिच्या मनाचा मोठेपणा! माझ्या लग्नाला आता 15 वर्ष झाली होती तरी माझी कूस उजवली गेली नव्हती, ह्याचं दुःख होतंच.
असो, बोलत काय बसले आहे. निकिता येणार आहे ना. तिच्या आवडीचा ढोकळा आणि भेळ करायची आहे. आणि हो, सासूबाई जवळ जवळ अडीच महिन्यांनी परत येणार आहेत तर त्यांची खोलीपण नीट आहे ना बघून घेते. हल्ली सासूबाई काही दिवस आमच्याकडे तर काही दिवस कुमुडकडे राहायला जातात.
सासूबाई घरी आल्या, निकिताने पोट भर भेळ खाल्ली, ढोकळा खाल्ला आणि डब्यातून घरीपण नेला. फार वेळ थांबले नाहीत तिघंही, साडे सातपर्यंत निघून गेले. खरं तर निकिताला माझ्या इथे राहायचं होतं, पण तिला परत न्यायला यायला लागेल म्हणून कुमुदने नकार दिला. मीपण रात्री काहीच जेवले नाही, थोडं अस्वस्थ वाटत होतं. निकिता निघून गेली की नेहमीच असं होतं. सासूबाईपण कपभर दूध पिऊन झोपल्या. मी झोपायला जाणार तेवढ्यात ह्यांचा फोन आला. ह्यांना घरी परत यायला अजून दोन दिवस लागतील हे सांगायला फोन केला होता. मी ठीक आहे असं म्हणून फोन ठेवला आणि खोलीत झोपायला जाताना, टीपॉयवर ठेवलेलं पोस्ट कार्ड पुन्हा दिसलं. ते घेऊनच खोलीत गेले.

पलंगावर आडवी होऊन पुन्हा ते पत्र वाचलं. तरी काही अर्थ बोध होईना. शेवटी विचार केला जाऊ दे, उद्या सासूबाईंनाच विचारू या कोणासाठी पत्र आहे, त्यांना ह्यातलं काही माहीत आहे का. विचारांच्या गुंत्यात कधी झोप लागली कळलंच नाही.
“अहो, हे पत्र बघता का जरा. दोन तीन दिवसांपूर्वीच आलं आहे. पत्त्यामध्ये माझं नाव आहे, म्हणून मी वाचलं. पण बहुतेक हे माझ्यासाठी नाहीये. सासूबाईंसाठी पण नाहीये, असं त्या म्हणाल्या”.
आज दुपारीच हे औरंगाबादहुन परत आले. दुपारचा चहा घेत असताना मी त्यांच्यापुढे ते पत्र ठेवलं. पत्र वाचल्यावर हे सुरुवातीला थोडे हसले, आणि म्हणाले, तुझंच पत्र आहे. शक्यच नाही असं मी म्हटल्यावर, हे पुन्हा गंभीर झाले.
सुरेखा, हे पत्र मातोश्री संस्थेकडून आलं आहे. मुलगी दत्तक घेण्याबाबत. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून हे पुढे म्हणाले, “दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? ज्या ज्या टेस्टस शक्य होत्या, त्या करून झाल्या. तुझे उपास तापास, व्रत वैकल्य झाली. तरी अजून पदरात काही नाही. तू बोलून दाखवत नाहीस, पण आई होण्याची तुझी इच्छा अपूर्ण ठेवायची नाहीये मला. लोकांना काय बोलायचं असेल ते बोलू दे. पण ही मुलगी दत्तक घेतल्याने जर आपण समाधानी होणार असू तर काय हरकत आहे. सुरेखा प्लिज ह्यावर तू विचार करावास असं मनापासून वाटतं”.

मनाच्या तळघरात दडवलेला विषय पुन्हा वर आला आणि विचारांच्या लाटा थपडा मारू लागल्या. मूल दत्तक घेण्यावरून ह्यापुर्वीसुद्धा बरेच वादविवाद झाले होते, त्यावरून सासूबाईंना, किशोर भाऊजींना हे सगळं अजिबात पटलं नव्हतं. पण ह्यांचा पूर्ण होकार होता. घरातली मोठी सून म्हणून त्यांच्याही काही अपेक्षा होत्या, साहजिक आहे ते म्हणा. त्यातली एक अपेक्षा होती, मला मूल व्हावं. पण माझ्याबाबतीत जणू नैसर्गिक रित्या गरोदर होऊन मुलाला जन्म देणं असंख्य प्रयत्न करूनही शक्य नव्हतं. हे माहीत असूनही, दत्तक घेण्याबद्दल त्यांचा विरोध होता.
सुरुवातीला मलाही खंत वाटायची, स्वतःचं मूल नसल्याची. पण निकितामुळे ही जखम थोडी भरली गेली आहे असं वाटू लागलं होतं, पण ती वेगळी राहू लागल्यावर, आपलं स्वतःचं मूल नाही, हा विचार पुन्हा मन पोखरू लागला होता. पण हळू हळू मीच माझी समजूत काढली की जे शक्य नाहीये, त्यावर का विचार करायचा. जगात करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष देऊ या. शिवाय जे नाहीये, ते मिळवण्याच्या नादात, घरात आता जी लोकं आहेत, त्यांना का दुखवायचं, हा दृष्टिकोन ठेवून मी ह्यावर मात करण्याचा प्रयत्न करत होते. आणि अचानक ह्यांनी अचानक हा विषय काढल्यावर मी अस्वस्थ झाले. अर्थात स्वतःचं मूल असावं, हे सुख ह्यांनाही उपभोगायचं होतं. त्यामुळे त्यांच्या मनाचा विचार करावा तोही सासूबाईंचा विरोध पत्करून, की हा विचार दूरच ठेवावा काहीच कळत नव्हतं.
चार पाच दिवस असेच निघून गेले. मग ह्यांनी झोपायच्या वेळेस विचारलं, “काय ठरवलं आहेस? तू जे ठरवशील ते मान्य असेल. कुठलीही बळजबरी नाही, हे तुला माहीतच असेल आणि त्यात मी तुला पूर्ण सहकार्य करेन. पण शक्यतो नाही म्हणू नकोस”.

ह्यांचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि माझा बांध सुटला. तशी ह्यांनी जवळ घेत म्हटलं, “सुरेखा, नको घाबरू. मी आहे ना. मी सर्वांना पटवून देईन. तू अजिबात काळजी करू नकोस. फक्त हो म्हण”. ह्यांनी सासूबाईंना आणि दिराला हो म्हणायला राजी केलं, अर्थात ते सोपं नव्हतंच. ह्यांना खूप स्ट्रेसफुल झालं होतं. मातोश्री संस्थेमध्ये जाऊन मुलीला रीतसर दत्तक घेण्याचा दिवस उजाडला आणि मनावर नकळतपणे दडपण आलंच. भावनिक गुंतागुंत वाढत चालली होती. लिगली ज्या डॉउमनेटस जी गरज होती, किंवा जी प्रोसेस पूर्ण करायची होती ती आम्ही दोन दिवस आधी जाऊन पूर्ण केली होती. आज फक्त दीक्षाला घरी घेऊन यायचं होतं. असंख्य विचारांच्या गर्दीत तिथे कधी पोचलो ते कळलंच नाही. पण दीक्षाला बघताच सर्व ताण तणाव दूर झाला आणि फक्त अश्रू त्यांचं काम करत होते. सव्वा वर्षांची पोर जवळ घेतली आणि जगातील सर्व सुख माझ्या ओंजळीत सामावल्याचा भास झाला. त्याच तंद्रीत आम्ही घरी पोचलो. आणि अजून एक सुखद धक्का बसला. कुमुदने दार उघडलं, आम्हा तिघांची दृष्ट काढली आणि औक्षण करू घरात प्रवेश करायला सांगितला. दीक्षाला पाहताच सगळेच निःशब्द झाले, नक्की कसं रेऍक्ट करायचं , सगळ्यांचा हाच गोंधळ उडाला होता, त्यामुळे कोणीच काही बोलत नव्हते. अचानक सासूबाईंनी, दीक्षा माझ्याजवळ ये बाळ, असं म्हटलं आणि मी भरून पावले. भगवान देता है तो छप्पड फाड के देता है, हेच खरं!
सुरुवात तर छान झाली, पण जस जसे दिवस जाऊ लागले, तशी एकेक समस्या डोकं वर काढू लागली.
त्या काळी वांझ असणं हा समाजासाठी फार मोठा प्रश्न होता. स्त्री आधीच दुःखी झालेली असते, त्यात भर म्हणून समाज वांझ वांझ म्हणून वांझ समाजाचं दर्शन घडवत असतं.

ते सगळं सहन केलं मी. पण जेव्हा निकीताला जाणवलं, माझं दिक्षावर प्रेम वाढलंय, तशी तिने अबोला धरला. घरी येणं बंद केलं. गणपतीतसुद्धा आली तरी दिक्षाशी बोलत नसे. मी तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला, पण दोघींसाठी माझा जीव तुटत होता. तिचाही काही दोष नव्हता. इतकी वर्षे मी माझं प्रेम तिलाच दिलं होतं, आणि आता त्यात वाटेकरी आली होती, ते तिला स्वीकारायला अवघड गेलं. मला तर असं वाटू लागलं की निकिता माझ्यापासून दूर जाते की काय! ह्यांनी मला धीर देण्यासाठी सांगितलं की, अगं दोघी लहान आहेत, मोठ्या झाल्या की समजूतदार होतील, अनुभव आले की त्यांनाही काय योग्य, अयोग्य, हे कळायला लागेल.
आता निकिता इंजिनीरिंग करून पुढील शिक्षणासाठी बंगलोरला जाणार म्हटल्यावर घरात आनन्द, टेन्शन, उत्साह, विरह असं संमिश्र वातावरण झालं होतं. ती जायला निघाली तेव्हा दिक्षाने तिच्या हातात पत्र दिलं. निकिताने वाचलं आणि तिने दिक्षाला मिठीच मारली. त्या पत्रात काय होतं, हे अजून आम्हा कोणालाही माहीत नाही. आम्ही विचारलं देखील नाही. पण त्या दिवसापासून निकिता खरी ताई बनली. पुढे दिक्षाला शिक्षणात मदत, मार्गदर्शन सगळं निकितानेच केलं. निकिता बंगलोर च्या कॉलेज मध्ये शिकत असताना एका विषयावर प्रोजेक्ट करत होती, ते प्रोजेक्ट एका अमेरिकेतील कंपनीला आवडलं आणि त्यांनी तिला त्यांच्याबरोबर काम करायला बोलावून घेतलं.
आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, दीक्षा काल मध्यरात्रीच्या विमानाने अमेरिकेला गेली, शिक्षणासाठी. आणि सोने पे सुहागा म्हणजे ती निकिताच्या घरीच राहणार होती, त्यामुळे मला काळजीच नव्हती.

– आरुशी दाते, पुणे

शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

4 Comments

 1. मुलगा नव्हे तर मुलगी दंग घेतली आहे.इथेच आधुनिक विचारसरणी दिसून येते.घरातील वातावरण छान रंगवलेले आहे.तसेच सामुदायिक निर्णय व पाठिंब्यामुळे मिळालेले यश सर्वाना आनंदी करणारे आहे.
  पण दीक्षा च्या पत्रात काय होते ? …फक्त अंदाजच करावा लागतो.
  एक चांगली कथा.

 2. खुपच छान कथा. आवडली मला आणि हो गुंतागुंत बरीच जाणवली आणि डोळे पाणावले. आरूशी दाते यांच्या लिखाणात एक जादू अनुभवायला मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close