कथासाप्ताहिक सदर

मात्रा वृत्तांची ओळख – वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी, पुणे

ओळख वृत्तबद्ध कवितेची हे साप्ताहिक सदर आम्ही मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी दर सोमवारी सुरू केले आहे. या सदराचे आतापर्यंत आठ भाग झाले असून हा १० भाग आम्ही आज प्रसिद्ध करीत आहोत. या सदरातुन प्रसिद्ध कवयित्री तथा लेखिका वर्षा बेंडीगेरी कुलकर्णी या सातत्याने लेखन करीत आहेत. आपण या सदराबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

मात्रा वृत्तांची ओळख

गेल्या काही भागात आपण वृत्तबद्ध कविता म्हणजे काय? लयीबरोबरचे तिचे नाते आणि त्यातूनच तिचे फुलणे बहरणे पाहिले. तसेच काव्य म्हणजे एक संकल्पना आहे हे समजून घेतले… गद्य आणि पद्य, कविता यातली साम्य स्थळे आणि फरक पाहिले. मात्रा म्हणजे काय? आणि ती मोजायची पद्धत यावर बोललो. भाषेचे थोडेसे व्याकरण समजून घेतले आणि एकूण काव्यरसांबाबत जाणून घेतले.

वृत्तबद्ध कविता ही एकूण तीन पद्धतीने लिहिली जाते. अक्षरगणवृत्त, मात्रा वृत्त आणि अक्षरछंद प्रत्येक आकृतीबंधाची आपापली स्वतंत्र नियमावली आहे. काही मात्रा वृत्तांची ओळख करून घेऊया…

पादाकुलक मात्रा वृत्त

मात्रा वृत्तामधील हे अगदी सहज सोपे वृत्त आहे असे मला वाटते. दोन पद्मावर्तनी मात्रा खंडांचा एकत्रित बंध म्हणजे पादाकुलक मात्रा वृत्त! आठ मात्रांची आवर्तने असणारी लय म्हणजे पद्मावर्तनी लय हे आपण पाहिले आहेच.
छंदोरचनेत माधवराव पटवर्धनांनी अष्टाक्षरीला पादाकुलक छंद असे म्हंटले आहे. अष्टाक्षरी हा एक अक्षरछंद आहे. म्हणजे त्यात फक्त अक्षरांची संख्या ठराविक असावी लागते. अष्टाक्षरी म्हणजे आठ अक्षरांचा छंद. लयीच्या सोयीसाठी म्हणून अक्षरछंदात प्रत्येक अक्षराची मात्रा दोन अशा पद्धतीने मोजली जाते त्यामुळे अष्टाक्षरीत एकूण सोळा मात्रा होतात. त्यामुळे त्याला पादाकुलक छंद असे नाव दिले आहे. पादाकुलक मात्रा वृत्त आणि पादाकुलक छंद यातला हा फरक आहे.

पादाकुलक मात्रावृत्त
(जातिवृत्त) ८+८ एकूण मात्रा १६ आठ मात्रानंतर एक विराम येतो त्याला खंड असे म्हणतात.
उदाहरण –

बालकवींची रचना

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती

इथे
हि र वे हि र वे | गा र गा लि
११ २ १ १ २ |२ १ २ २ १
चे

अशा पद्धतीने मात्रा मोजल्या जातात. उदाहरणादाखल एक संपूर्ण कविता. म्हणजे लय लक्षात येईल…

मात्रा वृत्त – पादाकुलक

कमळफुलांच्या तळ्यात नुकती
लाल जांभळी निळसर झगमग
आणि जागत्या काठावरती
गावकुसाची होते लगबग
तांबड ओल्या वळणावरती
प्राजक्तीची केशर टपटप
तिथून माझ्या वाट घराची
हलके हलके जाते ठुमकत

कुशीत येतो हिरवा चाफा,
शुभ्र चमेली घेते पापा
फुले अबोली, जास्वंदीची
जुई अंगणी देते हाका
अशा घराच्या पायठणीवर
पागोळ्यांची सुरेल गाणी
चुटुक लालसर पन्हळीमधुनी
पाऊसवेडे वाहे पाणी

पडवी ओटी माजघराशी
जाल स्वतःला तिथेच हरवत
भिंतीमधले कोनाडेही
गंमत गोष्टी बसती सांगत
एक पायरी डावीकडची
माडीवरती जाते दुडकत
पहाल तेथे खिडकीमधुनी
डोंगर हिरवे येती दौडत

उतरून झरझर खाली येता
झोपाळ्याची नाजुक करकर
वैल चुलीशी धुरकट धुरकट
फू फू येते ऐकू फुंकर
खाऊसाठी रेलुन बसता
इथेच वाटे तंबू टाका
पण आजीची शिकवण आहे
देवापुढती आधी वाका

– वैशाली शेंबेकर मोडक

पुढच्या भागात नवनवीन वृत्तांविषयी जाणून घेऊ

ओळख वृत्तबद्ध कवितेची संपुर्ण भाग वाचण्यासाठी निळ्या अक्षरांवर क्लिक करा…
भाग १ , भाग  २,  भाग  ३, भाग  ४, भाग ५ , भाग ६ , भाग ७, भाग  ८,  भाग ९
हे ही वाचा मराठी व्याकरण उजळणी करतांना… 
वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी, पुणे
संपर्क – 9767588937

शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

3 Comments

 1. किती किती छान भासते
  मनात जणू चांदणे हसते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close