कथासाप्ताहिक सदरसाहित्य प्रकार

हायकू समजून घेताना…  (साप्ताहिक सदर – भाग ३) – कविता क्षीरसागर

मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी आम्ही "हायकू समजून घेताना..."  हे साप्ताहिक तीन भागमध्ये प्रसिद्ध केले आहे. ‘‘हायकू’’ काव्य प्रकारातील बारकावे समजून घेता यावे यासाठी आमचा हा प्रयत्न होता. या सदरामधून प्रसिद्ध कवयित्री कविता क्षीरसागर यांनी लेखन केले आहे. त्यांचा ‘‘गंधकुपी’’ हा हायकू व अल्पाक्षरी कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. यासह त्यांचा ‘‘जन्म कवितेचा’’ हा काव्य संग्रह आणि ‘‘सांगू का आई?’’ हा बालकविता संग्रह प्रकाशित आहे. विषयाच्या अनुषंगाने आपल्या काही शंका असल्यास मराठी साहित्य वार्ताला अवश्य कळवा अथवा खाली लेखिकेचा संपर्क दिला आहे त्यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. या सदरातील आजचा तीसरा म्हणजेच शेवटचा भाग आज प्रसिद्ध करीत आहोत. या सदराला वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. आमच्या विनंतीस मान देवून कविता क्षीरसागर यांनी या विषयावर लेखन केल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार. - संपादक

हायकू समजून घेताना…  (साप्ताहिक सदर – भाग ३) – कविता क्षीरसागर

मागील भागात आपण हायकूचा थोडक्यात परिचय आणि त्याचे नियम पाहिले. या भागामध्ये काही हायकू व हायकूसदृश कविता, माहिया, त्रिवेणी हे तीन तीन ओळींचेच अजून काही काव्यप्रकार आहेत त्यांची थोडक्यात ओळख करुन घेऊ या.

हायकूचे तांत्रिक नियम व्यवस्थित पाळूनही अनेकदा हायकू फसू शकतात. कारण त्यात काव्यगूण नसतो. म्हणजे जणू आत्माच नसतो. मग ते हायकू फसलेले, सपाट हायकू वाटतात. अशा हायकूंची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतील. पण किमान त्यांचा प्रवास चांगला हायकू लिहिण्याच्या दिशेने तरी चालला आहे ही समाधानकारक बाब वाटते. तसे नेटाने त्या दिशेने चालत राहिल्यास विशुद्ध हायकू नक्की जमेल हे लक्षात ठेवावे व प्रयत्न चालू ठेवावे. स्वतः बाशोपण लिहितो की, अनेक हायकू लिहिल्यानंतरच अगदी विशुद्ध हायकू जन्माला येतो. त्यामुळे सराव करायला हवाच.

मला आवडलेले इतर हायकूकारांचे व माझे हायकू खाली देते आहे.

दोन्हीही खांदे
नात्यांना सांभाळून
आले दुखून

जुन्या जखमा
कपडे बदलून
आल्यात पुन्हा

दे ना निरोप
किती वेळ नुस्ताच
हातात हात

– संजय चौधरी

नात्यांची वीण
उसवली जराशी
काळजापाशी

झाडांमधून
आभाळ डोकावलं
खिडकी झालं

कोवळं ऊन
रानफुल हसलं
गात बसलं

– सुनीति लिमये

पाऊस सरी
आणि आपण दोघे
एकटे घरी

आला श्रावण
रान झालं हिरवं
अगदी नवं

पाऊस आला
पानावर मोती
ठेवून गेला

– राजन पोळ

जाणीव आत..
नसतोच कोणीही
पूर्ण सुखात

धुकं तलम..
भेगाळल्या भूमीला
लावी मलम..

अंधार वाट
नजर सरावली
प्रकाश झाली..

– कविता क्षीरसागर

यानंतर आपण हायकूसदृश रचना किंवा मुक्त हायकू हा तीन ओळींचाच काव्यप्रकार पाहू. याला शब्दांचे, मात्रांचे बंधन नसते. पण कमितकमी शब्दात मोठा आशय असतो. खरेतर अक्षरांचे बंधन सोडल्यास बाकीचे नियम हायकू सारखेच असतात म्हणूनच याला हायकूसदृश किंवा मूक्त हायकू म्हणतात. जेष्ठ कवयित्री शिरिष पै यांनी असे बरेच हायकू लिहिले आहेत.

याची ही काही उदाहरणे… हायकूसदृश रचना

केव्हापासून करतोय कावकाव
खिडकीवरला कावळा
इतका भरून येतो त्याचाही गळा?

नको रे धरूस चिमटीत
फुलपाखराचं नाजूक अंग
दुखतोय… पंखांवरला रंग

– शिरिष पै

आपल्या आकर्षक वेगळेपणाच्या
जाणिवेपासून दूर …
हे लाल ताटव्यातलं पिवळं फूल..

पिकलं पान गळुन पडलं
“आता तुझी पाळी …”
कानात कुणीसं कुजबुजलं .

– कविता क्षीरसागर

यानंतर त्रिवेणी रचनेकडे आपण वळू. जेष्ठ कवी गुलजार यांच्या त्रिवेणी अतिशय प्रसिद्ध आहेत. या रचनेला त्रिवेणी नाव दिले गेले कारण इलाहाबादच्या त्रिवेणी संगमाप्रमाणेच इथेही तीन ओळींचा संगम होतो. तिथे संगमावर गंगा आणि जमुना आपल्याला स्पष्ट दिसतात पण सरस्वती संगमावर आल्यावर दोघांच्या प्रवाहात बेमालूम मिसळते, तिथे तिचे वेगळे अस्तित्व दिसत नाही. सरस्वती प्रमाणेच त्रिवेणीची तिसरी ओळही या रचनेला पूर्णत्व देते. तिसरी ओळ स्वतंत्र असली तरी ती पहिल्या दोन ओळीत बेमालूम मिसळते. आणि पहिल्या दोन ओळीतील गुढ तिसऱ्या ओळीत उमगते.

माझ्यामते हायकूसदृश रचना व त्रिवेणी यात महत्त्वाचा फरक म्हणजे हायकूसदृश रचनेत अगदी कमितकमी शब्द असतात तर त्रिवेणीमधे तसे बंधन नाही. पहिल्या दोन ओळींपेक्षा यात शेवटची कलाटणी जास्त वेगळी व अनपेक्षित असावी लागते. तिसरी ओळ ही अनपेक्षित असलीतरी पहिल्या दोन ओळींचाही ती भाग वाटली पाहिजे.

उदाहरणे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.

रात के पेड़ पे कल ही देखा था चाँद
बस पक के गिरने ही वाला था

सूरज आया था, ज़रा उसकी तलाशी लेना

इतने लोगों में, कह दो अपनी आंखों से
इतना ऊँचा न ऐसे बोला करें

लोग मेरा नाम जान जाते हैं

– गुलजार

तुझ्या डोक्यावर तुझ्या घराचा भार
कागद, पत्रा, काच हीच शाळा …

तुझे तारूण्य , वार्धक्याने कधीच बळकावलेले

आत्मसन्मान बाजारात विकून आलो
डोळ्यात रक्त उतरेपर्यंत झगडलो….

इच्छांचे पोट अजून खपाटीलाच कसे ?

– सुनीति लिमये

माहिया हा पंजाबी लोकगीत प्रकार आहे. गझलकार घनश्याम धेंडे यांनी तो मराठीत आणला. हा काव्यप्रकार तीन ओळींचा असून त्याला हायकूप्रमाणे अक्षरांचे नाही पण मात्रांचे बंधन आहे.

मात्रा
2 21 1222 -12 पहिली ओळ
21 1222 -10 दुसरी ओळ
221 1222 -12 तिसरी ओळ

पहिल्या व तिसऱ्या ओळीत यमक असे याचे नियम आहेत. मुख्यतः करुण रस व शृंगार रसात या रचना जास्त केल्या जातात. आपण हिंदी सिनेमामधे या प्रकारातील बरीच गाणी ऐकलेली आहेत. त्याची चालही ठराविक असते. अतिशय शांत व सहज गुणगुणता येणारी.

हुस्न पहाडोंका
यहा बारो महिने
है मोसम जाडोंका

किंवा

बागो मे पडे झुले
तुम भूल गये हमको
हम तुमको नही भूले …

अशी बरीच उदाहरणे हिंदी गाण्यांमधेही सापडतात. खाली अजून काही माहियांची उदाहरणे दिली आहेत .

उंची दिवारे है
ऊनसे भी उंची
मन की मिनारे है

– डाॕ ज्योत्स्ना शर्मा

हे प्रेम असे कोडे
सोडविले ज्यांनी
ते लोक जगी थोडे

– घनश्याम धेन्डे

माहिया

बेताल जरी सारे
दूर कसे व्हावे
हा पाय निघेना रे

आकाश खुले सारे
पंख पसर आता
उड्डाण पुन्हा घे रे

– कविता क्षीरसागर

अशाप्रकारे आपण या लेखामधे तीन तीन ओळींच्या काव्यरचना व त्याची थोडक्यात माहिती, नियम व उदाहरणे पाहिली. मला हे लेख लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मराठी साहित्य वार्ताचे मनापासून आभार मानते व थांबते. धन्यवाद .

कविता क्षीरसागर, पुणे
संपर्क – ९४०३१८५९२२
शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close