साप्ताहिक सदर

Ambedkarite ghazal || सौंदर्य म्हणजे काय? – डॉ. प्रकाश राठोड

Ambedkarite ghazal || आंबेडकरवादी गझलेतील सौंदर्यविचार (लेख क्र. ३२)

Ambedkarite ghazal || आंबेडकरवादी गझल: आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आंबेडकरवादी गझल ही सुंदर गझल आहे. वाङ्मयीन सौंदर्यगुणांनी परिपूर्ण आणि वाङ्मयीन महत्तेच्या कसोटीत तंतोतंत बसणारी गझल आहे. गझलेच्या ठराविक आकृतिबंधात बसणारी तंत्रशुद्ध गझल आहे आणि आशयसौंदर्याच्या अंगाने अत्यंत समृद्ध, संपन्न व सकस गझल आहे, अशी सौंदर्यवाचक नुसती विधाने केल्याने आंबेडकरवादी गझलेचा सौंदर्यशोध घेता येत नाही; तर त्यासाठी या गझलेच्या अंतरंगाचे सूक्ष्मावलोकन करून तिचे मन जाणून घेणे आवश्यक आहे. ही गझल कोणत्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर जन्माला आली?, ती रंजनप्रधान आहे की प्रबोधनकारी बाण्याची आहे?, भोवतीच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनातील कोणत्या वृत्ती-प्रवृत्तींना ती धारेवर धरते?

Ambedkarite ghazal || आंबेडकरवादी गझल: आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या गझलेच्या ध्येयातला समाज कसा आहे?, का आहे?, या गझलेच्या अंतर्मनातील माणूसनिष्ठेचे सांस्कृतिक आदिबंध कुठे आहेत?, ही गझल कोणत्या मूल्यसंस्कृतीचा पुरस्कार करते?, का करते?, ती कोणत्या समाजघटकांची बाजू घेते? अशा मूलभूत प्रश्नांच्या अनुषंगाने आंबेडकरवादी गझलेच्या अंतरंगातील आशयाचे मूल्यशोधन केले तरच या गझलेच्या सौंदर्यशीलतेचा तळ गवसणे शक्य आहे. या आधीच्या लेखात गझलेला केवळ शरीर असून चालत नाही तर मनही असावे लागते असे विधान मी केले होते. शरीर तर गझलेची अटळताच असते; परंतु तिच्या शरीरसौष्ठवावरून वा तिच्या बाह्य तंत्रशुद्ध रूपावरून आंबेडकरवादी गझल सुंदर आहे असे म्हणता येत नाही. कोणत्याही साहित्यकृतीचे सौंदर्य हे रूपावरून नव्हे तर गुणावरून ठरत असते.

Ambedkarite ghazal || आंबेडकरवादी गझल
Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल

गुण म्हणजे साहित्यकृतीची सर्वांगसुंदर आणि समुन्नत अशी उदात्त ध्येयदृष्टी. कलाकृतीचा हा सर्वांगपरिपूर्ण सुंदर ध्येयवाद कलावंताच्या मनाच्या सुंदरतेतून आणि सुंदरतेसाठीच्या त्याच्या अस्वस्थतेतून जन्माला येत असतो. कलाकृतीचे मन सुंदर असणे म्हणजे कलाकृतीच्या आशयात सुंदर समाजनिर्मितीचा उत्कट ध्यास असणे. एखादी साहित्यकृती सुंदर आहे याचा अर्थ त्या साहित्यकृतीचे केवळ बाह्यांग सुंदर आहे असा होत नाही. सुंदर ग्रंथ, सुंदर कविता, सुंदर कादंबरी, सुंदर कथा असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या त्या साहित्यकृतीच्या अंतर्मनासंबंधीच आपण बोलत असतो. हे अंतर्मन सुंदरच असते. त्यात सर्वांच्या सर्वकल्याणाचे संयोजन असते, म्हणून ते सुंदर असते. या सुंदरतेचा शोध घेणे हे सौंदर्यशास्त्राचे कार्य असते.

Ambedkarite ghazal || आंबेडकरवादी गझल: आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सौंदर्यशास्त्राचे कार्य सर्व सुंदर गोष्टींमध्ये समान सत्व शोधून काढणे हे असते आणि सर्व कलांमध्ये समान सत्व शोधून काढणे हे पारंपरिक सौंदर्यशास्त्रज्ञाचे उद्दिष्ट असते. नैसर्गिक सृष्टीविषयीचे सिद्धांत व सौंदर्यशास्त्राचे सिद्धांत वेगळे असतात. सर्व सुंदर गोष्टींमध्ये सौंदर्य नावाचे एक समान सत्व असावे असेही एक गृहीतकृत्य असते. त्यामुळे सौंदर्य, कला, वाङ्मय इत्यादी संकल्पनांच्या तार्किक वैशिष्ट्यांची चिकित्सा करण्यापूर्वी सौंदर्य ही संकल्पना मुळातूनच समजून घेणे आवश्यक आहे. सौंदर्यविषयक संकल्पनेच्या संदर्भात अनेक मतेमतांतरे आहेत. सौंदर्य म्हणजे काय? किंवा सौंदर्याचे एकमेवाद्वितीय असे काही तत्त्व असते काय? या प्रश्नांची निश्चित उत्तरे देता येत नाही. सौंदर्यविषयक संकल्पनेच्या रूढ साच्यातच या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात.

Ambedkarite ghazal || आंबेडकरवादी गझल: आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सौंदर्य म्हणजे मानवी मनांना आकर्षित करून उच्चतम आनंद प्राप्त करून देणारा गुण अशी सौंदर्यविषयक एक सामान्य धारणा आहे आणि पूर्वसुरींच्या सौंदर्यविषयक संकल्पनांवर ती अधिष्ठित आहे. सौंदर्याचे काही विवक्षित असे निकष असतात आणि व्यक्तीपरत्वे, व्यक्तीच्या उपयोगितेपरत्वे ते बदलत असतात. सौंदर्य हा वस्तूचा गुण नसतो. वस्तूची निर्मिती ही नैसर्गिक असते. वस्तूंची रूपे निसर्गदत्तच असतात. त्यामुळे वस्तूंना स्वतःची रूपांतरे वा अवस्थांतरे करता येत नाही. फुले सुंदर दिसतात. फुलांना सुगंध असतो. परंतु फुलांचे सुवासिक असणे आणि त्यांचे मोहक दिसणे हे नैसर्गिकच असते. फुलांच्या परिश्रमांचे ते आविष्कार नसतात. आपण सुंदर आहोत, सुगंधी आहोत हे फुलांना माहीत नसते.

Ambedkarite ghazal || आंबेडकरवादी गझल: आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याचा अर्थ सौंदर्य वस्तूत नसते तर त्या वस्तूकडे पाहणाऱ्याचा दृष्टिकोनात असते. हा दृष्टिकोन ऐंद्रिय संवेदना, उपयोगिता आणि भयशून्यता यांच्या एकसंध अनुभूतींशी संलग्न असतो. साप हा तसा सुंदरच प्राणी आहे. नागमोडी सरपटणारे चमकदार लवचिक नळकांडे हे लक्षवेधीच असते. परंतु साप विषारी प्राणी असतो आणि त्याचा दंश जीवघेणा असतो. त्यामुळे साप दिसताच माणूस भयभीत होतो. जीविताच्या भयामुळे तो सापाच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊ शकत नाही. या भयग्रस्ततेमुळे वा सापाच्या अंगी असलेल्या विषारीपणामुळे तो या सौंदर्याची अनुभूती प्राप्त करून घेऊ शकत नाही.

Ambedkarite ghazal || आंबेडकरवादी गझल: आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वाघासिंहाचेही अगदी तसेच आहे. या प्राण्यांचेही बाह्यांग सुंदरच असते. परंतु हे प्राणी नरभक्षक असतात. या प्राण्यांपासून जीविताला धोका असतो. त्यामुळे हे हिंस्र पशू दिसताच माणूस घाबरून जातो. या प्राण्यांपासून जीविताला धोका नसता तर हे प्राणी मनोवेधक आणि सुंदरच दिसले असते. ते हिंस्र, आक्रमक किंवा धोकादायक वगैरे वाटले नसते. सोनेरी आयाळ, सर्वांगावर असलेले तुकतुकीत पिवळे – काळे पट्टे, बारीक चमकदार डोळे, तीक्ष्ण धारदार मिशा, चकचकीत सुळेदात हे बाह्यसौंदर्य ऐंद्रिय संवेदनांना आकर्षित करणारेच आहे. परंतु माणसाच्या मनातील असुरक्षिततेच्या भावनेमुळे माणूस या प्राण्यांच्या बाह्यसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. मोर विषारी असता तर त्याचा फुलता पिसारा पाहून माणूस हरखून गेला नसता. तसेच हिरवळ विषारी असती तर कुठलीही हिरवळ त्याला सुंदर दिसली नसती.

Ambedkarite ghazal || आंबेडकरवादी गझल: आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याचा अर्थ सौंदर्यानुभूती वा सौंदर्यास्वाद ही मानसिक स्तरावरील अनुभूती होय. ऐंद्रिय संवेदना ह्या केवळ माध्यमरूप असतात. ऐंद्रिय संवेदनांना वेधून घेणारे सुंदर असते हे बाह्यात्कारी खरे वाटत असले तरी ते पूर्ण खरे नाही. इंद्रियांना आकर्षित करणारी वस्तू मनाला आनंद देणारी असेल तरच ती वस्तू सुंदर आहे असे म्हणता येते. याचा अर्थ सौंदर्यासंबंधीचा अंतिम निर्णय हा मनाचा निर्णय असतो. वस्तू आणि इंद्रिय यांच्यात मनाची भूमिका निर्णायक असते. जीवनासाठी उपकारक वस्तूच मनाला आनंद देणारी असते. म्हणून मनाला आनंद देणारी वस्तू ही खऱ्या अर्थाने सुंदर वस्तू असते.

क्रमशः

डॉ. प्रकाश राठोड, नागपूर
चलभाष : 9923406092

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close