साप्ताहिक सदर

Circular poem || वल्लभा आणि मध्यरजनी दासी (अग्न्यावर्तनी मात्रा वृत्त भाग २) – वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी, पुणे

ओळख वृत्तबद्ध कवितेची (साप्ताहिक सदर)


Circular poem || वृत्तबद्ध कविता ओळख वृत्तबद्ध कवितेची (साप्ताहिक सदर)

(Circular poem || वृत्तबद्ध कविता)अठ्ठावीस मात्रा संख्या असणारी तीन अग्न्यावर्तनी मात्रा वृत्त आहेत. पैकी एक जीवकलिका म्हणजेच वियद्गंगा हे आपण पाहिले. यातील दुसरे मात्रा वृत्त म्हणजे वल्लभा!

मात्रा वृत्त वल्लभा –
गागालगा+ गागालगा+ गागालगा+गागालगा =२८
हीच लगावली मंदाकिनी या अक्षरगणवृत्ताची आहे. अक्षरगणवृत्तात अक्षरसंख्येबाबत नियम असतात त्यामुळे त्याच क्रमाने लगावलीनुरूप लिहायचे असते आणि मात्रा वृत्तात एकूण मात्रा संख्या पाहिली जाते. त्यामुळे एका गुरू स्वराऐवजी दोन लघु स्वर वापरता येतात.

उदा.
चल वाकुनी बघतेस का? चल वल्लभे बघुं वाकुनी!
वरती सभोती हे धुके लाटांवरी लाटा किती
या वृत्तातली एक संपूर्ण कविता –

(Circular poem || ओळख वृत्तबद्ध कवितेची साप्ताहिक सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वृत्त वल्लभा

खिडकीतुनी डोकावुनी बघ पाहतो प्राजक्त हा
मौनातुनी माझ्यासवे नित बोलतो प्राजक्त हा
जग शांत सारे झोपते तेंव्हा खुले प्राजक्त हा
वाटे मुनी ध्यानस्थ ऐसा डोलतो प्राजक्त हा

संन्यस्त देठातून उमटे सौरभी घन – शुभ्रता
लावण्यमय कोमल-मृदुलतर पाकळ्यांची चारुता
ही राजसी आरास करते वैभवाची वाच्यता
गंधातुनी रंध्रातुनी गंधाळतो प्राजक्त हा

मज वाटते कोणी उभी ही हरितवस्त्रा यौवना
अथवा थव्याने बैसल्या स्वर्गातल्या त्या चांदण्या
निःशब्द नीरव मध्यरात्री भास होतो लोचना
जणु चक्रधर श्रीकृष्ण होउन हासतो प्राजक्त हा

भोगी म्हणू त्यागी म्हणू उमजेचना प्राजक्त हा
सजतो स्वतः विझतो स्वतः स्थितप्रज्ञ स्थिर प्राजक्त हा

 • योगिनी जोशी

(Circular poem || ओळख वृत्तबद्ध कवितेची साप्ताहिक सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मध्यरजनी हे आणखी एका अठ्ठावीस मात्रा संख्या असणाऱ्या अग्न्यावर्तनी वृत्ताचे नाव आहे.
मात्रा वृत्त मध्यरजनी –
गालगागा +गालगागा +गालगागा + गालगागा = २८

याच लगावलीतील अक्षरगणवृत्ताचे नाव व्योमगंगा आहे जे गझललेखन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरले जाते.
उदा.

जाहली मम| मध्यरजनी |झोपतो मी| गाढ शयनी
जाग तू भरदिवस तव ये तीव्र तापे ताप सखये

या तीनही अठ्ठावीस मात्रा संख्या असणाऱ्या पण किंचित लगावली वेगळी असणाऱ्या वृत्तांवरून हे दिसते की सात मात्रांच्या खंडातील लघु स्वराची जागा बदलल्याने लगावलीत फरक आहे आणि त्यामुळे लयीत फरक पडतो.

(Circular poem || ओळख वृत्तबद्ध कवितेची साप्ताहिक सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्रा वृत्त- मध्यरजनी
खेळ
भिंत मोठी चीनची अन् नेत्रदीपक नायगारा
कोपरा प्रत्येक खंडाचा धृवांचा शीत वारा
…. सर्व किमया मानवी किंवा निसर्गातील मोठ्या
रोज धुंडाळीत गेलो गूढ विश्वाचा पसारा

ही अनिश्चितताच की हा खेळ दैवाचा म्हणावा
मी हजारो मैल असता दूर तो संदेश यावा
…. नातवाचा फक्त फोटो कवळला हातात असता
भेटण्याआधीच शेवटचा कुणी का श्वास घ्यावा

भव्य जे ते दिव्य जे ते पाहण्याचा ध्यास होता
तोडणे साधेपणा हा सूक्ष्मसा हव्यास होता
…. मात्र हातातून सारे योग्य ते अवचित निसटले
राजवस्त्राआत आता लाभला संन्यास होता

टाळणे मी ह्याच संन्यासास ठरले दिव्य काही
निसटणे स्वीकारतो अन् मानतो मी रसिकताही

 • निलेश पंडित
  (१ जानेवारी २०१७)

अग्न्यावर्तनी मात्रा वृत्तानंतर पुढच्या काही भागात काही हरावर्तनी मात्रा वृत्त पाहूया.

Circular poem

वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी, पुणे
संपर्क – 9767588937

वृत्तबद्ध कविता

शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close