लोकसंवाद

Wamandada Kardak || प्रयोगशील आंबेडकरवादी गझलकार : वामनदादा कर्डक

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल

Ambedkarite Ghazal || “आंबेडकरवादी गझलेचे सर्जनसौंदर्य” हे साप्ताहिक सदर आम्ही मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी दर रविवारी सुरू केले आहे. या सदराद्वारे ज्येष्ठ आंबेडकरी गझलकार तथा साहित्यिक प्रमोद वाळके ‘युगंधर’ आणि आंबेडकरवादी साहित्यिक डाॅ. प्रकाश राठोड हे सातत्याने लेखन करीत आहेत. या साप्ताहिक सदराची समीक्षा प्रसिद्ध गझलकार मसूद पटेल यांनी केली आहे. ती आज आम्ही येथे प्रसिद्ध करीत आहोत. आपले साहित्य मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टलवर प्रसिद्ध करण्यासाठी websahityawarta@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा. दर्जेदार लिखानाला निश्चत प्रसिद्धी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. – संपादक

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल : काही स्पष्टीकरणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आंबेडकरवादी गझलचे सर्जन सौंदर्य भाग – २४ या लेखामध्ये आदरणीय प्रमोद वाळके सरांनी फार मौलिक अशी माहिती आंबेडकरवादी गझलेच्या अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टलवर प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखांमध्ये वामनदादांची उर्दू परंपरेतील उच्चारी वजनाच्या गझलांवरील हुकूमत अनेक उदाहरणांसहित अनुभवली आहे. वामनदादांचा मराठी गझलेच्या छंदशास्त्राचा अभ्यास नव्हता असा संभ्रम पसरवणा-यांना वाळके सरांनी स्पष्टपणे वामनदादांच्या वृत्तबद्ध गझलांचा लेखात समाविष्ट करून त्यांचा संभ्रम फारच प्रभावीपणे दूर केला आहे.

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल
Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल

मराठीच्या प्रचलित एक दोन नव्हे तर तब्बल १६ वृत्तांमध्ये वामनदादांनी गझललेखन केले असल्याचे वाचून आम्हा तमाम आंबेडकरवादी गझलप्रेमींना या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो आहे. उर्दूचे महान कवी दस्तुरखुद्द ग़ालिब साहेबांनी सुद्धा मोजक्याच वृत्तांमध्ये गझला लिहिणे पसंत केले होते. या पार्श्वभूमीवर वामनदादांची १६ वृत्तांमधे झालेली भ्रमंती ही फार मोठी उपलब्धी आहे. या लेखात वामनदादांनी छंदोरचनेचे (प्रचलित वृत्तांव्यतिरिक्त ) काही नवीन प्रयोग केल्याची दुर्मिळ अशी माहिती (त्यांच्या गझलांसह) वाळके सरांनी आम्हा आंबेडकरवादी गझलेच्या वाचकवर्गापर्यंत पोहोचविली आहे.

वाळके सर इथेच थांबले नाहीत तर त्यांनी वामनदादांच्या या नवीन छंदोरचनांचा अतिशय बारकाईने अभ्यास करून नामकरणसुद्धा केले आहे. वाळके सरांनी सदर लेखात वामनदादांच्या गझलेतील ‘उ’ आणि ‘अ’ या अलामत बदलीचा उल्लेख केला आहे. ही बाब खरेतर आता गझलेतील ग्राह्य सूट झाली आहे. अलामतीत ‘अ’ हा स्वर स्थापित झाल्यावरही पुढील शेरात ‘उ’, ‘इ’ अलामत घेणे गैर समजले जात नाही. कविश्रेष्ठ सुरेश भट साहेबांनी सुद्धा अलामतीच्या स्वरात सुट घेतली आहे. उदाहरणादाखल त्यांच्या गझलेतील काही शेर देऊन यांची पुष्टी करीत आहे.

   हा असा चंद्र अशी रात फिराया साठी 
   तूच नाहीस इथे हात धराया साठी 

   चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती! 
   राहिले कोण अता सांग झुराया साठी ?

   आडवी एक तिथे भिंत मनाची आली 
   दार होतेच कुठे आत शिराया साठी ?

सदर गझलेमध्ये शेरागणिक अलामत जरी बदलली असली तरी शेरांची उंची आणि आशयघनता वाखाणण्याजोगी आहे. वामनदादांच्या एका अतिशय गाजलेल्या गझलेद्वारे या संदर्भात जणू सूचक असा संदेशच दिला आहे. वाळके सरांच्या या लेखाने वामनदादांना खऱ्या अर्थाने प्रयोगशील गझलकार म्हणून स्थापित केले आहे. या कार्यासाठी प्रमोद वाळके ‘युगंधर’ सरांना सर्वच गझलकारांतर्फे मनापासून अनुमोदन दिले पाहिजे.

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

आंबेडकरवादी गझलचे सर्जन सौंदर्य भाग -२५ मधील वामनदादांच्या नवीन छंदोरचनांचे नामकरण प्रक्रियेतील या लेखात समाविष्ट असलेल्या गझलेच्या वृत्ताला आपण दिलेले ‘रमाई’ हे नाव फारच सूचक आणि दूरदृष्टीचा परिचय करून देणारे आहे. रमाई नाव म्हणजे त्यागाचे प्रतीकच आहे. वामनदादांचे अख्खे जीवन चळवळीला वाहिलेले होते. समाज जागृतीसाठी सततची भटकंती, सततचे कार्यक्रम त्यांच्या वाट्याला आले असल्याने कित्येक रचना त्यांनी कदाचित उर्दू परंपरेनुसार मंचावरसुद्धा रचल्या असतील. त्यांना आपल्यासारखे ए. सी. च्या अभ्यासिकेत तासनतास बसून रचना लिहिणे शक्य तरी झाले असेल का? या पार्श्वभूमीवर वामनदादांनी लिहिलेल्या गझलांमधील काही ओळी मराठी गझलेच्या लगावलीनुसार न येता उर्दूच्या उच्चारी वजनानुसार येणे हा त्यांच्या गझलेतील दोष नसून ही गोष्ट त्या झपाटलेल्या काळात साहजिकच होती हे आदरणीय प्रमोद वाळके सरांनी फारच स्पष्टपणे आणि समर्पक उदाहरणासहित या लेखात नमूद केले आहे.

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

आणखी एक महत्त्वाचा तपशील वाळके सरांनी या लेखातून दिलेला आहे. त्यांनी या लेखात वामनदादांनी रचलेल्या दोन नवीन वृतांचा तपशील आणि या दोन्ही वृत्तांचे केलेले नामकरण मला खूप आवडले. आज आपण ज्याला जदीद गझल (आधुनिक गझल ) म्हणतो त्याच्या खाणाखुणा वामनदादांच्या गझलेत आढळून आल्याच्या आपल्या मताशी सर्वच रसिक सहमत होतील इतकी समर्पक रचना प्रमोद वाळके सरांनी लेखात समाविष्ट केली आहे. मराठी गझलेने व्यक्तीकडून समष्टीकडे केलेल्या प्रवासाची सुरुवात वामनदादांपासून झाल्याची पुष्टी करणारा अप्रतिम लेख रसिकांना समर्पित केल्याबद्दल आदरणीय प्रमोद वाळके सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करावेसे वाटते !

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

वामनदादा बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. अशा व्यक्तिमत्त्वाला साहित्यामधील कोणताच प्रकार, कोणतीच विधा कठीण किंवा अशक्यप्राय नसते. परंतु वामनदादांनी आपल्या चळवळीसाठी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून गझलेला अधिक पसंती दिल्याचे जाणवते. कारण गझलेच्या दोन ओळीतील शेरात असलेली अभिव्यक्तीची शक्ती त्यांनी आधीच हेरली होती. याला त्यांचा द्रष्टेपणाच म्हणता येईल. साहित्याचा कोणताही प्रकार असो त्याच्या निर्मितीची, उत्पत्तीची ठेकेदारी काही विशिष्ट समूहांनी आपल्या नावे करून ठेवली आहे. गझल या काव्यविधेला मराठीत आणल्याचे क्रेडिट वामनदादांना मिळता कामा नये याची सुद्धा तरतूद या चाणाक्ष समूहांनी त्यांच्या गझलेतील दोष जगजाहीर करून योग्य प्रकारे करून ठेवली होती. त्यांच्या या तरतुदीला काही आपली माणसेसुद्धा बळी पडली आहेत.

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

परंतु आदरणीय प्रमोद वाळके सरांनी अथक प्रयत्नांती अनेक जुने दुर्मिळ असे संदर्भ गोळा करून खरे वामनदादा रसिकांपर्यंत पोचविले आहेत. वामनदादांच्या रचनांमध्ये या तथाकथित समीक्षकांना ज्या तृटी आढळल्या त्या वास्तवात तृटी नसून उर्दूच्या उच्चारी वजनातील सवलती होत्या, हे वाळके सरांनी आपल्या लेखमालिकेत क्रमाक्रमाने सोदाहरण नमूद केलेलेच आहे. सद्या ही लेखमालिका वामनदादांनी निर्मिलेल्या नवीन वृतांचा मागोवा घेत असून आजच्या लेखात १.चरियापिटक आणि २.महाधिती अशा दोन वृत्तांचा फारच सुंदर रित्या परिचय करून दिला आहे.

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग -२८ या लेखाद्वारे वामनदादा कर्डक यांच्या गझलांचे वृत्त समजावून सांगता सांगताच आंबेडकरवादी गझलेचे जनक वामनदादा कर्डक आहेत, या गोष्टीची पुष्टी आदरणीय प्रमोद वाळके सरांनी या लेख मालिकेद्वारे अनेक दुर्मिळ असे संदर्भ गोळा करून फारच प्रभावीपणे केली आहे. वामनदादांचा उर्दूच्या उच्चारी वजनाच्या गझलांवरील अभ्यास, त्यांची उर्दूचे शायर आणि कव्वाल यांच्या सोबतची घनिष्टता, त्यांच्या मराठी गझलांमधील तंत्राचा वापर, त्यांच्या जदीद गझला, त्यांची नवीन वृतांबाबतची प्रयोगशीलता इ. माहिती टप्या टप्प्याने या लेख मालिकेच्या माध्यमातून वाळके सरांनी आपल्यापर्यंत पोहोचविली आहे. वामनदादांनी हाताळलेल्या नवनवीन वृत्तांचे नामकरण करताना लेखकाच्या कल्पकतेची आणि अभ्यासू वृत्तीची या लेख मालिकेत ठायी ठायी प्रचिती आली आहे.

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

आजच्या लेखातील वृत्ताचे केलेले ‘अभिजती’ नामकरणसुद्धा याला अपवाद नाही. वामनदादांच्या प्रयोगशीलतेने प्रभावित होऊन वाळके सरांनी एका नवीन वृत्तामध्ये मोठ्या बहरची (३६ मात्रा )अप्रतिम अशी गझल लिहून आणि या वृत्ताचे ‘नागवंशी’ असे नामकरण करून आंबेडकरवादी गझलेच्या जणू नवीन पायवाटेची सुरुवात करून दिली आहे. आता आंबेडकरवादी गझलेच्या नवीन शिलेदारांनी ही पायवाट इतकी भक्कम करावी की मराठी गझलेच्या विश्वालासुद्धा याची दखल घेणे भाग पडावे. वाळके सरांच्या या ‘नागवंशी’ वृत्तामधील गझलेवर मित्रवर्य विनोद बुरबुरेजी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया प्रतिक्रीयेच्या विश्वात मैलाचा दगड ठरावी इतकी सुंदर आहे. मला विनोदजीच्या लेखन शैलीचा आणि लेखन क्षमतेचा हेवा वाटतो.

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

प्रमोद वाळके ‘युगंधर’ यांनी समारोपीय लेखांमध्ये काही स्पष्टीकरणे देताना फारच स्पष्टपणे आणि समर्पक शब्दात स्पष्टीकरण केले आहे. पारंपरिक (रिवायती )गझलेचे दोन मुख्य प्रकार म्हणजे मुसलसल गझल आणि गैरमुसलसल गझल आहेत. कालांतराने जदीद गझल, तरक्कीपसंद गझल इ. अनेक प्रकार रिवायती गझलेच्या शाखा (Branches )म्हणून रूढ होत गेले. परंतु रिवायती गझलेच्या महतीवर याचा काडी मात्रही परिणाम झाला नाही. रिवायती गझल आपल्या दोन मुख्य प्रकारांसह आजही तेवढीच लोकप्रिय आहे. आजही तेवढाच गोडवा आणि परिणामकारकता जोपासून आहे. जसा जसा काळ बदलत गेला तशी तशी गझल नवीन रूप धारण करीत गेली आहे, गझलेत नवीन नवीन सामाजिक विषय अंतर्भूत होत गेले आहेत. वामनदादांचा काळ जर बघितला तर त्या काळात सामाजिक दरी मिटवून बाबासाहेबांच्या विचारांना घरोघरी पोचवणे अगत्याचे होते.

Wamandada Kardak || आंबेडकरवादी गझल वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

म्हणून वामनदादांनी त्या काळाची प्रथम आवश्यकता समजून या विषयाला प्राधान्य दिले होते. ज्याला आज मुसलसल गझल संबोधल्या जात आहे; ती खरे तर त्या काळाची आवश्यकता होती. वामनदादांना जिथे संधी मिळाली तिथे त्यांनी गैरमुसलसल गझलासुद्धा लिहिल्या आहेत हे आदरणीय वाळके सरांनी आजच्या लेखात सोदाहरण स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता या लेखमालिकेतून वाळके सरांनी वामनदादांच्या वृत्तबद्ध गझला, उर्दूच्या उच्चारी वजनाच्या गझला, अनेक नवीन वृत्तामधील गझला यांचे अनेक सशक्त पुराव्यांसहीत फारच प्रभावीपणे मांडणी करून टीकाकारांना सडेतोड उत्तरे दिली आहेत. वामनदादांची थोरवी तर आमच्या काळजावर कोरली गेली आहे. येणाऱ्या काळात त्यांचे टिकाकारही त्यांच्या थोरवीचा स्वीकार करतील अशी आशा करूया आणि हीच या लेख मालिकेची फलश्रुती ठरेल यात दुमत नसावे.

मसूद पटेल
९६०४६५३३२२

शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close